मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून आज बीड मध्ये एक ऐतिहासिक सोहळा पार पडला आहे. हा सोहळा साधारणतः नसून बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा अविश्वसनीय क्षण आहे. बीड जिल्ह्यात नव्याने उभारण्यात आलेल्या बीड रेल्वेस्थानक येथे डेमू रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आज नवीन उभारण्यात आलेल्या बीड रेल्वेस्थानक येथे बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचा शुभारंभ पार पडला. या डेमू ट्रेनला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. या घटनेमुळे बीडकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावरून भाषण करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांनी रेल्वेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर रेल्वेसाठी केलेल्या संघर्षाची आठवण देखील व्याजपीठावरून शेअर केली.
6 किलोमीटर अंतरावर आहे हे रेल्वे स्थानक
ही डेमू रेल्वे बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर धावणार आहे. तर पहिल्या टप्प्यात बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा 167 किमी मार्गावर बीडकरांचा प्रवास सुरू झाला आहे. बीड येथे उभारण्यात आलेले नवीन रेल्वेस्थानक हे बीड स्टॅन्ड पासून 6 किलोमीटर अंतरावर पालवण गावात आहे.
एवढे भाडे आकारण्यात येणार
या डेमू रेल्वेचे भाडे काय असणार हा सर्वाना पडणारा प्रश्न आहे. त्यानुसार हे भाडे समोर देखील आहे आले. डेमू रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपयांपर्यंतचे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. त्यानुसार बीड येथून अहिल्यानगरला जाण्यासाठी केवळ 40 रुपये खर्च येईल. मात्र, बीड शहरापासून 6 किमी दूर असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षावाले 150 ते 200 रुपयांपर्यंत भाडे आकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
166 किलोमीटरचा टप्पा प्रवाशांसाठी खुला
या बीड ते अहिल्यानगर प्रवासात एकूण 15 रेल्वे स्थानक असणार आहे. त्यानुसार पहिले स्टेशन राजुरी नवगण असून बीड येथून फक्त 10 रुपयात प्रवास करू शकतात. अहिल्यानगर-बीड-परळी हा संपूर्ण रेल्वेमार्ग 261 किमीचा आहे. परंतु त्यापैकी आज बीड-अहिल्यानगर या 166 किमी मार्गाचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. तर पुढील बीड-परळी टप्प्यातील काम अजूनही बाकी आहे.
बीडकरांना अहिल्यानगर जाण्यासाठी 5.30 तास लागणार
बीड ते अहिल्यानगर हा प्रवास बस ने करण्यासाठी अडीच ते पावणे तीन तास लागतात. परंतु डेमू रेल्वेने प्रवास करायचा असेल तर 5 ते 5.30 तास लागणार आहेत. कारण या रेल्वेचा सरासरी वेग 30 किमी प्रती तास असेल. या मार्गावर दररोज एक गाडी येणार आहे.