यंदा 2025 मध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई व्हावी यासाठी शेतकरी वाटेकडे आस लावून बसला असून आता महाराष्ट्र सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.
आज याच मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत अतिवृष्टीग्रस्तांना 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना हस्तगत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानुसार या मदत पॅकेजमध्ये पीक नुकसान, जमिनीची धूप, घर आणि जनावरांचे नुकसान, तसेच पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी भरीव मदत या बाबींचा समावेश असणार आहे.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महर्षतार्तील सद्यस्थितीतील भीषण परिस्थिती, गमावलेले जीव आणि त्यांच्या मालमत्तेचे झालेले नुकसान, यासह शेतकरी आणि शेतीच्या नुकसानीची माहिती याबाबत संपूर्ण माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री पूरग्रस्त ठिकाणी भेट देण्यास आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील 1 कोटी 43 लाख 52 हजार 141 हेक्टर क्षेत्रावर असलेल्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून यापैकी 29 तालुक्यांमध्ये सर्वाधिक फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सरकारकडून नुकसानग्रस्त भागात मदत जारी करण्यात येणार आहे.
खरडून गेलेल्या जमिनीसाठी 3 लाख 47 हजार रुपये मदत अदा करण्यात येणार
पीक आणि जमीन नुकसानीसाठी प्रति हेक्टर रक्कम अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.त्यानुसार खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर 47 हजार रक्कम रोख अदा करण्यात येणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून खरडून गेलेल्या जमिनीसाठी 3 लाख रुपये याप्रमाणे एकूण खरडून गेलेल्या जमिनीसाठी 3 लाख 47 हजार रुपये मदत अदा करण्यात येणार आहे. यानुसार हंगामी बागायती शेतीसाठी 27 हजार, बागायती शेतीसाठी 32 हजार 500, प्रति हेक्टर रब्बी पीक घेता यावे यासाठी 10 हजार तर विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना (विमा व्यतिरिक्त) 17 हजार एवढी रक्कम दिली जाणारा आहे. त्याचबरोबर कोरडवाहू शेतीसाठी 35 हजार तर विमा उतरवलेल्या बागायती शेतीसाठी 50 हजार पेक्षा अधिक रक्कम अदा करण्यात येणार आहे.
दुधाळ जनावरांच्या मृत्यूसाठी 37 हजार रुपयांपर्यंत मदत
पीक नुकसान यासह इतर बाबींसाठी देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यानुसार दुधाळ जनावरांच्या मृत्यूसाठी 37 हजार रुपयांपर्यंत मदत करण्यात येत आहे. कुक्कुटपालन संदर्भात प्रति कोंबडी 100 रुपये तर गाळ भरलेल्या विहिरींच्या नुकसानीसाठी प्रति विहीर 30,000 रुपयांची मदत करण्यात येणार आहे. पूर्वपरिस्थितीमुळे पूर्णपणे नष्ट झालेली/पडझड झालेली घरे नव्याने बांधण्यासाठी देखील सरकारकडून मदत दिली जाणार आहे. तर डोंगरी भागातील नागरिकांना नवीन घरांसाठी 10,000 रुपये जास्त मदत देण्यात येणार आहे. त्यानुसार दुकानदार, झोपडीधारक आणि गोठ्यांच्या नुकसानीसाठी 50 हजार रुपये, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट देण्यात येणार आहे. यापूर्वी पायाभूत सुविधा जसे कि, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या भरपाईसाठी यापूर्वी 10,000 कोटी रुपये देण्यात आले आहे, यामध्ये आता आणखी 15,000 कोटी रुपये देण्यात येणार आहे.
तसेच पीक नुकसान भरपाई म्हणून 65 लाख हेक्टरला 10, 000 कोटी रुपये तर इतर गोष्टींसाठी 27 हजार ते 32 हजार 500 पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.