मुंबई : राज्याची तसंच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी मोठा बदल घडवण्याचा मनसुबा रेखाटण्यात आला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) नं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्यानं शहरातील काही मुख्य मार्ग भूमिगत करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत दक्षिण मुंबईतील गर्दी कमी करणं, मोकळी रेल्वे जमीन विकासासाठी खुली करणं आणि इतर वाहतूक माध्यमांसोबत लोकल गाड्यांची समन्वय सुधारणं हा उद्देश आहे.
कोणते मार्ग भूमिगत होणार? :
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सुमारे 5 किलोमीटरचा मार्ग भूमिगत करण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई सेंट्रलजवळ हा मार्ग पुन्हा जमिनीवर आणला जाईल. तर मध्य रेल्वे मार्गावर CSMT ते परळ दरम्यान सुमारे 8 किलोमीटरच्या पट्ट्यात अतिरिक्त दोन उपनगरीय मार्ग तयार करण्यावर सखोल अभ्यास सुरु आहे. या मार्गांमध्ये भूमिगत, उन्नत, जमिनीवरील किंवा मिश्र स्वरूप अशा विविध पर्यायांचा विचार केला जात आहे.
भायखळा इथं होणार मोठा इंटरचेंज हब :
या अभ्यासात भायखळा इथं एक मोठा इंटरचेंज हब तयार करण्याची शक्यता तपासली जात आहे. हा हब तयार झाल्यास मुंबईतील विविध वाहतूक नेटवर्कची जोडणी सुधारेल आणि प्रवाशांसाठी सहजतेची सुविधा वाढेल.
प्रकल्पाचे फायदे :
दक्षिण मुंबईतील मोकळी रेल्वे जमीन सार्वजनिक वापरासाठी किंवा पुनर्विकासासाठी खुली होईल. उपनगरीय मार्गांची कार्यक्षमता वाढेल, प्रवाशांना अधिक जलद गाड्या आणि जास्त सेवा मिळेल. मुंबई मेट्रो, BEST बसेस आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांशी थेट जोडणी निर्माण होईल. लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोसारख्या जागतिक शहरांमध्ये यशस्वी ठरलेल्या शहरी रेल्वे प्रणालींचा अभ्यास प्रकल्पात केला जात आहे. मुंबईतील लाखो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास या प्रकल्पामुळं बदलणार असून शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांना आधुनिक स्वरुप मिळेल, हे निश्चित आहे.