जालना जिल्ह्यातील घनसावंगी शहरालगत असलेला पाझर तलाव फुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शेतात पाणीच पाणी झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात येल्लो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आल्याने पावसाचा जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या जिल्हातील छोटे मोठे लघुतलाव, ओढे,नाले ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे संपूर्ण शेतात पाणीच पाणी साचल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यानंतर दोन दिवसापासून महाराष्ट्रात सर्वत्र पाऊसाचे वातावरण पाहायला मिळाले. काल रात्री घनसावंगी शहरालगत असलेला खटकळीचा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. यामुळे हा तलाव पूर्णपणे फुटला असून मोठ्या प्रमाणात हे पाणी शेतात घुसले आहे. याठिकाणी कुठल्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसली तरी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे.दरम्यान घनसावंगी तालुक्यात मागील काही दिवसापासून जोरदार अतिवृष्टी होत असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून मदत देण्याचा मागणी आता शेतकऱ्यांनमधून केली जात आहे.