• Home
  • ताज्या बातम्या
  • ड्रॅगन पेटला अन् ज्वाळांनी घेतला ताबा! राजवाड्यात श्री आगमन सोहळ्याआधी थरार; मोठा अनर्थ टळला
महाराष्ट्र

ड्रॅगन पेटला अन् ज्वाळांनी घेतला ताबा! राजवाड्यात श्री आगमन सोहळ्याआधी थरार; मोठा अनर्थ टळला

Satara Rajwada Dragon Replica Fire
52

सातारा | प्रशांत जगताप, प्रतिनिधी

Satara Rajwada Dragon Replica Fire: साताऱ्याच्या राजवाडा परिसरात श्री आगमन सोहळ्याच्या तयारीदरम्यान भव्य ड्रॅगनच्या प्रतिकृतीला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केले; मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

गणरायाच्या आगमनाचा जल्लोष सुरू होण्याआधीच साताऱ्याच्या राजवाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी आगीच्या भडक्याने एकच खळबळ उडाली. ‘सह्याद्रीचा राजा मित्र मंडळा’च्या श्री आगमन मिरवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या भव्य ड्रॅगनच्या प्रतिकृतीने अचानक पेट घेतल्याने परिसरात अक्षरशः पळापळ उडाली. काही क्षणांतच आगीने लगतच्या आणखी एका प्रतिकृतीलाही कवेत घेतले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मंगळवारी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास राजवाडा परिसरात आगमन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. त्याचवेळी ड्रॅगनच्या प्रतिकृतीला आग लागल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला किरकोळ भासणाऱ्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. ज्वाळा वेगाने भडकू लागल्याने नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रसंगावधान राखत अनेकांनी घटनास्थळापासून सुरक्षित अंतर गाठले.

हेही वाचा: एआयच्या मदतीने शिवेंद्रसिंहराजेंचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल; तीन फेसबुक खाती आणि युट्यूब चॅनेलविरोधात गुन्हा

आगीची माहिती मिळताच सातारा नगरपालिका ( Satara Latest News) अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतली. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेचीही मदत घेण्यात आली. दोन अग्निशमन बंबांच्या सहाय्याने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, मंडळाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ठेवलेला जनरेटर आगीत पूर्णपणे जळून खाक झाला.

गर्दीमुळे वाहतूक कोंडीचे आव्हान

राजवाडा बसस्थानकासमोर आगमन सोहळ्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यातच आगीच्या घटनेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली. माहिती मिळताच सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या.

दरम्यान, या घटनेने मोठ्या प्रतिकृती, जनरेटर आणि विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवातील वाढत्या गर्दीच्या (Ganesh Festival Fire) पार्श्वभूमीवर मंडळांनी अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे या घटनेने अधोरेखित केले.

नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड. दत्ता बनकर यांनी घटनेची माहिती दूरध्वनीवरून घेतली. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना नागरिक आणि कार्यकर्त्यांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने जपावी, असे आवाहन त्यांनी केले.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts