दुबई : आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात सुपर-4 फेरीतील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. यानंतर या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहाननं अर्धशतक झळकावल्यानंतर वादग्रस्त सेलिब्रेशन केलं. त्याच्या या सेलिब्रेशनवरुन विरोधकांनी बीसीसीआय आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
साहिबजादा फरहाननं काय केलं : वास्तविक या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर साहिबजादानं केलेल्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात त्यानं आपली बॅट बंदुकीसारखी चालवत वादग्रस्त शैलीत अर्धशतक साजरं केलं. हे सेलिब्रेशन भारतीय चाहत्यांना आवडलं नसून त्यावरुन टीका केली जात आहे. तसंच त्याच्यावर कारवाईची मागणीही केली जात आहे.
खासदार संजय राऊतांची टीका :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर साहिबजादा फरहाननं केलेल्या सेलिब्रेशनवरुन लिहिलं, “आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडलं. साहबजादा फरहान याचं अर्धशतक लागताच त्यानं मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरुन गोळीबाराची एक्शन केली, पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता. बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचं सैन्य आणि पुलवामा पहेलगाम मध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे, अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत!”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, “बीसीसीआय, गृह मंत्रालय आणि मनसुख मांडवीय यांचं अभिनंदन. मला आशा आहे की हे फोटो तुम्हाला पुरेसं समाधान देतील आणि दोन्ही देशांमधील ऑलिंपिक भावनांवर परिणाम करणार नाहीत. हे त्रासदायक आहे, परंतु रक्तपाताच्या मागे पैसे कमवण्यात व्यस्त असलेल्यांसाठी नाही.”
टीम इंडियाने सामना सहज जिंकला :
या सामन्यात टीम इंडियानं चार विकेट गमावून 19व्या षटकात विजय मिळवला. अभिषेक शर्मानं शानदार फलंदाजी करत 39 चेंडूत पाच षटकार आणि चार चौकारांच्या मदतीनं 74 धावा केल्या. शुभमन गिलनंही उत्कृष्ट फलंदाजी दाखवत 28 चेंडूत 47 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 172 धावांची आवश्यकता होती, जे त्यांनी सात चेंडू शिल्लक असताना काढल्या. यासह या स्पर्धेत पाकिस्तानला पुन्हा एकदा टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला.