रायगड: वडापाव हा सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे. कुठेही गेलं तरी वडापाव कुणाला ही खावा वाटतो. आणि तो सहज उपलब्ध सुद्धा होतो. वडापावचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. स्वस्त आणि मस्त शिवाय कुठेही झटपट खाता येणारा हा पदार्थ. महाराष्ट्राच्या कुठल्या ही कानाकोपऱ्यात हा वडापाव मिळतो. प्रत्येक गावात, वाडीत वडापावची गाडी ही असतेच. मात्र, जर तुम्ही वाडापाव प्रेमी असाल, तर ही धक्कादायक बातमी नक्की वाचा. कारण, वडापाव बाबत एक किळसवाणी आणि तेवढीच धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर इथे घडली असून हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वच जण हादरले आहेत.
खालापूर तालुक्यातील मुंबई-पुणे जुन्या हाय-वेवर चौक गाव आहे. या गावातच उजाला नावाचे हॉटेल आहे. हे या गावातील वडापावसाठी फेमस हॉटेल असल्याने याठिकाणी ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. पण, आज इथे एक किळसवाणा प्रकार समोर आला असून इथे एका ग्राहकाने वडापाव खाण्यासाठी घेतला असता त्याच वेळी त्याला वडापाव खाताना त्यामध्ये पाल आढळली. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्राहकांनी हॉटेल मालकाला याचा जाब विचारला. आणि नंतर हा वाद वाढत गेला.
चौक गावातील उजाला हॉटेलमध्ये सोमवारी नाश्ता करण्यासाठी भरत वाघ हे गेले होते. त्यांनी वडापाव खाण्यास मागविला होता. या वेळी वडापाव खाताना भरत यांना तोंडात काहीतरी वेगळे जाणवले. त्यामुळे त्यांनी वडा कुस्करून पाहिला. त्यात त्यांना पूर्ण वाढ झालेली पाल मृतावस्थेत सापडली. या घटनेनंतर येथील ग्रामस्थानी हॉटेल मालकाला जाब विचारला. त्यावेळी हॉटेल मालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. ग्रामस्थांनी त्या हॉटेल मालकाला धारेवर धरले. झालेला प्रकर गंभीर असल्याचे सांगितले.
दरम्यान, ही घटना चौक गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर जागरूक ग्रामस्थांनी हॉटेलमालकाला हॉटेल बंद करण्यास भाग पाडले. या अगोदर देखील चौक येथील हॉटेलमधील खाद्य पदार्थात झुरळ, किडे, पाली आढळल्या होत्या. परंतु अन्न व औषध प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. चौक येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी प्रशासनानेकडे आता या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे सांगितले असून वडापावमध्ये पाल आढळणे म्हणजे ग्राहकांच्या जीवाशी खेळण्यासारखेच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.