गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर येथील नांदणी गावातील माधुरी हत्तीणीला पुनर्वसन केंद्रात घेऊन गेल्यानंतर वनतारा हे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र चर्चेत आले होते. त्यानंतर वनतारा आणि अनंत अंबानी यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. यावेळी करण्यात आलेल्या आरोपांवर आता वनताराला क्लीन चिट देण्यात आली आहे.
गुजरात येथील जामनगर येथील प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनताराला सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिले आहे. या प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान वनतारासंदर्भात न्यायालयाने अद्याप कोणताही आदेश दिला नाही, परंतु वनताराला क्लीन चीट दिली आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालय नियुक्त एसआयटीचा अहवाल सादर करण्यात आला.
कायद्याचे पालन न करणे, भारतातुन आणि परदेशातून प्राणी आणणे, खास करून हत्ती सारखे प्राणी आणणे हा आरोप वनतारा वर करण्यात आला आहे. बेकायदेशीर वन्यजीव हस्तांतरण आणि हत्तीच्या बेकायदेशीर बंदीवासाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती. या आरोपांची चौकशी करण्यासाठीच एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणी एसआयटीने शुक्रवारी हा अहवाल जारी केला होता.
हे प्रश्न न्यायालयात मांडण्यात आले
आम्हाला संपूर्ण अहवाल सार्वजनिक करायचा नाही, जगातील अनेक लोकांचे आमच्याशी शत्रुत्व आहे त्यामुळे याचा गैरवापर होऊ शकतो असे मत वनताराचे जेष्ठ वकील हरीश साळवे यांनी मांडले.यावर न्यायाधीश पंकज मिथल यांनी न्यायालय असं होऊ देणार नाही आम्ही तुम्हाला अहवाल देऊ जेणेकरून सुधारणांची जर गरज असेल तिथे तुम्ही करू शकतात असे सांगितले. तर समितीचा अहवाल न्यायालयाने ठरवलेल्या प्रश्नांवर असून तो कोणालाही तोच प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित करण्याची परवानगी देत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे.
न्यायालयाचा सवाल
मंदिरातील हत्तींचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर न्यायाधीशांनी असे वक्तव्य केले की, तुम्हाला कसं कळतं मंदिरातील हत्तींचे योग्य काळजी घेतली जात नाही यावर न्यायालयाने आपल्या देशात अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपल्याला अभिमान वाटू शकतो त्यांना अनावश्यक वादात अडकवू नये, जर एखाद्याला हत्ती पाळायचा असेल आणि तो सर्व नियमांचं पालन करून असं करत असेल तर त्यात गैर काय, असा सवाल न्यायालयाने केला.