संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणा-या महाराष्ट्राला एक धार्मिक, सांस्कृतिक, परंपरा लाभलेली आहे. आषाढ महिना सुरु झाला की, लहानग्यांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वाना आषाढी वारीची ओढ लागते. पांडुरंगा चरणी लीन झालेल्या वारकऱ्याला हरिमय झालेल्या वातावरणात कशाचेही भान राहत नाही. यंदाची आषाढी वारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाली असून एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
आषाढी पालखीमध्ये सहभागी झालेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा आणि वारकऱ्यांना लुटल्याचे प्रकार उघड झाले आहे. ही घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली. पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले. या दोन जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. त्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहे.
काही दिवसांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात बोगस पास विकण्याची घटना घडली होती. सासवड परिसरात बनावट पास बनवून तुम्हाला देवाचे पास 100 रुपयात देतो अशी फूस वारकऱ्यांना लावण्यात येत होती. हे बोगस पास घेऊन वारकरी विठ्ठल मंदिरात पोहोचले तेव्हा स्कॅनिंग करताना हा प्रकार उघडकीस आला होता.