दादर-माहीम परिसरातील एका कार्यक्रमात माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. सरवणकर यांनी आमदार नसतानाही २० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा दावा केला असून, विद्यमान आमदारांना फक्त दोन कोटी रुपये मिळतात, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका उडाला आहे.
सरवणकर हे शिंदे गटाशी संलग्न असून, कार्यक्रमादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “मी आमदार नाही, याची मला कल्पना आहे. तरीसुद्धा प्रत्येक सोसायटी, प्रत्येक इमारतीत विकासकामे केली आहेत. मला सरकारकडून पाठबळ असल्यानेच हे शक्य झाले,” असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी कामाच्या राजकारणाला महत्त्व दिले पाहिजे, जातीपातीच्या राजकारणावर भर देणारे लोक निवडून येतात, अशीही टीका केली.
सदा सरवणकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माहिमध्ये झालेल्या तिरंगी लढतीत त्यांचा पराभव झाला होता. या लढतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे, शिंदे गटाकडून सरवणकर आणि उबाठा गटाकडून महेश सावंत रिंगणात होते. अखेर उबाठा गटाचे महेश सावंत यांनी अनपेक्षित विजय मिळवत सरवणकर यांना धक्का दिला. या पराभवानंतरही सरवणकर स्थानिक राजकारणात सक्रिय राहिले आहेत आणि सतत सभांमधून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा राज्यात निधी वाटपावरून महायुती सरकारवर सतत दुजाभावाचे आरोप होत आहेत. विरोधक वारंवार म्हणत होते की, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये काही निवडक लोकांनाच जास्त निधी दिला जातो. आता सत्ताधारी गटातीलच एका माजी आमदाराने अशा प्रकारची कबुली दिल्याने विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.
सदा सरवणकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधक कशी भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने अशा वादग्रस्त विधानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या वक्तव्याचे पडसाद आगामी निवडणुकांवर उमटतील का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.