मुंबई : लग्न आणि शुभकार्यासाठी सोनं खरेदी करुन आर्थिक गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. याशिवाय लग्नकार्यात महिलांसाठी विशेष आभूषण म्हणून सोनं खरेदी केली जाते. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या वडिलांना सोनं खरेदी आता आवाक्याबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 3600 डॉलरपर्यंत पोहोचला आहे. अशातच एका अमेरिकन फर्मनं सोन्याच्या किमतीबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. अमेरिकन फर्म जेफरीज या फर्मनं दिलेल्या अहवालानुसार येत्या काळात सोन्याचा दर दुप्पट होण्याची शक्यता आहे.
सोन्याची किंमत होणार दुप्पट :
अमेरिकन फर्म जेफरीजनं हा अंदाज सोन्याच्या किमतीच्या भूतकाळातील वाढीच्या ट्रेण्डच्या आधारावर व्यक्त केल्याचं सांगण्यात आलं. 1980 मध्ये अमेरिकेतील दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत सोन्याची किंमत सर्वाधिक होती. सध्या अमेरिकेतील दरडोई उत्पन्न 66100 डॉलर आहे तर सोन्याची किंमत 3670 डॉलर प्रति औंस आहे. जर 1980 च्या रेशोनुसार सोन्याची किंमत वाढली तर ती 6600 डॉलरपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. सध्याच्या दरापेक्षा ही किंमत जवळपास दुप्पट असेल.
भारतावर काय परिणाम होईल ? :
जर जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली तर त्याचा निश्चितच परिणाम भारताच्या बाजारपेठेवरही दिसून येईल. सध्या भारतात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 12 हजार 740 रुपयांवर पोहोचला आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दरही लक्षणीय वाढला आहे. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी सोन्याचे दर 1 लाख 2 ते 5 हजार एवढ्या किंमतीवर होते, मात्र गणेशोत्सवानंतर पुन्हा सोन्याला झळाळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. जर जेफरीजचा अंदाज खरा ठरला तर भारतीयांना सोन्याची खरेदी करणं आणखी महाग होईल.
सर्वात मोठा सराफा बाजार मुंबईत :
देशातील सर्वात मोठा सराफा बाजार मुंबईतील झवेरी इथं आहे. याशिवाय केरळच्या त्रिशूरला गोल्ड कॅपिटल ऑफ इंडिया म्हटलं जातं. भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथील झवेरी बाजाराला देशातील सर्वात मोठा सोन्याचा बाजार म्हटलं जातं. हा आशियातील सर्वात मोठा सोन्याचा बाजार मानला जातो. मुंबईचा झवेरी बाजार 160 वर्षू जुना आहे. 1864 मध्ये सराफा व्यापारी त्रिभुवनदास झवेरी यांनी याची सुरावत केली होती. तेव्हापासून या बाजाराला झवेरी बाजार म्हटलं जातं.