महाराष्ट्रातील मुंबई येथील कल्याण मध्ये एका अल्पवयीन मुलीवर स्वतः तिच्या नातेवाईकांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या घटनेतील सात आरोपींना अटक करण्यात पोलिसानं यश आले आहे.
मुंबईतील कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर नातेवाईकांसह आठ जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. या फरार आरोपीचा पोलिस पथक शोध घेत आहे. अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी याबाबत कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी पोलिसांनी सामूहिक बलात्कार तसेच POCSO कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी ही कल्याण पश्चिम येथील परिसरात वास्तव्यास आहे. ती वास्तव्यास असलेल्या परिसरात एक नातेवाईक देखील राहतो. काही महिन्यांपूर्वी या नातेवाईकाने पीडित मुलीशी इन्स्टाग्रामवर चॅटिंग केली. या चॅटिंग दरम्यान त्याने “तुला बॉयफ्रेंड आहे का?” असे विचारले. यावर पीडितेने नकार दिला. त्यानंतर, या व्यक्तीने तिला बॉयफ्रेंड देण्याचे आश्वासन देत तिची ओळख एका पुरूषाशी करून दिली. यानंतर पीडितेला एका अनोळखी ठिकाणी बहाण्याने बोलावण्यात आले. त्यानंतर आठ आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
या प्रकरणी आणखी एक बाब उघड झाली असून पीडिता ही गर्भवती राहिली आहे. यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबाला संपूर्ण घटना सांगितली आहे. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हेगारांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे. या 8 आरोपींपैकी सात जणांना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे. तसेच या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यासह गुन्ह्यात वापरलेली कार आणि आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.