पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक पुण्यासारखीच शिस्तीत आणि नियोजन पूर्ण असते. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर या असा गोड आग्रह केला जातो. पुण्यातील मानाच्या गणपती मिरवणुकीसाठी देशभरातून भाविक येतात. मात्र, या वर्षी विसर्जन मिरवणुकीवरून वाद निर्माण झाले होते. त्यामुळे यावर्षी भाविकांना मिरवणूकीला मुकावे लागते काय असे वाटत असताना, मात्र पुण्याचे खासदार मंत्री मुरलीधर मोहोळ त्यांच्या मध्यस्थीने विसर्जनाचा वाद मिटला. आणि विसर्जनाचे नियोजन करण्यात आले.
पुण्याची विसर्जन मिरवणूक नेहमी संस्कृती जपणारी असते, त्यात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो. परंतु, यंदा पुण्याच्या मंडळामध्ये विसर्जन मिरवणुकीवरून वाद पेटला होता. प्रत्येक वर्षी मिरवणुकीत प्रचंड गर्दी असते, त्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीमुळे बाकीच्या गणपती मिरवणुकीसाठी उशीर होतो. पुण्यातील मानाच्या गणपतीसोबतच बाकीच्या गणेश मंडळाचे वेळेत विसर्जन व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र गर्दीवर नियत्रंण मिळवण्यासाठी कठीण जाईल म्हणून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्तांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी केला. मात्र त्यावर तोडगा निघत नव्हता. पुण्याचे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मध्यस्थी करत यावर तोडगा काढला.
यावर्षीही नेहमीसारखी परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमांकाने विसर्जन मिरवणूक निघतील असा निर्णय मंत्री मोहोळ यांनी घेतला. पुण्यातील मानाचे गणेश मंडळ आणि बाकीचे गणेश मंडळ यांची मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत सगळ्या मंडळांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला असून सकाळी नऊ च्या दरम्यान मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होईल आणि परंपरेनुसार मंडळांचे क्रम असतील.
काही मंडळांनी आधी असं मत व्यक्त केलं कि, आम्ही आधी विसर्जन मिरवणूक सुरु करू त्यांनतर मानाच्या मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होईल, पण काही मंडळांनी त्यावर आक्षेप घेतला. परंतु, खासदार मोहोळ यांच्या मध्यस्थीने परंपरेनुसार विसर्जन मिरवणूक करण्याचे ठरले. या बैठकीत ‘ देशभरातून भाविक गणेश विसर्जन मिरवणूक बघायला येतात, तेव्हा असे वाद आपल्या हिताचे नाही’ असे विधान खासदारांनी केले.
या बैठकीत झालेले निर्णय –
- सकाळी नऊनंतर विसर्जन मिरवणुकीला परंपरेनुसार सुरुवात
- मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीसोबत बाकी मंडळाचे नेहमीच्या क्रमाने विसर्जन मिरवणूक होणार
- एकाच ठिकाणी जास्त काळ कोणतेही गणेश मंडळ थांबणार नाही.
- गणेश मंडळावर वेळेवर मिरवणूक संपवण्याची जबाबदारी असेल.
- सामाजिक भान प्रत्येक मंडळाने राखून कायद्याचे उल्लंघन करू नये.
प्रीती हिंगणे ( लेखिका )