Pune | Crime News : देशभरात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरु असून सर्वत्र देवीचा जागर केला जातोय. तर अनेक ठिकाणी कर्तृत्वान महिलांचा सत्कार आणि सन्मान सोहळे सुरू आहेत. एकूणच नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा सण. मात्र, असं असताना सुद्धा अनेक ठिकाणी या दिवसात अनेक अनुचित आणि स्त्री अपमानाचे प्रकार समोर येतात. असाच स्त्री अवहेलनेचा प्रकार विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून समोर आला आहे. एकीकडे स्त्रीशक्तीचा जागर चालला असताना मात्र,दुसरीकडे अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला असून एका दानावाप्रमाणे एक तरुण एका तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. एका किरकोळ वादातून या तरुणाने तरुणीला कानशिलात लावत लाथा बुक्क्यांनी मारल्याचे या व्हिडीओत दिसत असून व्हिडिओ पुण्यातला असल्याची माहिती आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
घटनेचा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
दरम्यान, ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर जाणाऱ्या मार्गावर घडली. आता ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली, मारहाण करणारा तरुण कोण आणि तो संबंधित तरुणीचा कोण आहे? याबद्दल कुठली ही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत कुठली ही तक्रार प्राप्त न झाल्याची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीसांनी दिली. मात्र, असं असलं तरी सुद्धा या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.