अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं एक दिवसीय चिंतन शिबिर नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी कुणाचंही नाव न घेता उशिरा येणारे मंत्री, नेते तसंच नेमून दिलेल्या जिल्ह्यात फक्त झेंडावंदनासाठी जाणाऱ्या पालकमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. आपले काही पालकमंत्री फक्त शासकीय कार्यक्रमांनाच उपस्थित राहतात. ज्या शहरात जातात तेथील जिल्हाध्यक्षांकडे बघतसुद्धा नाहीत, पदाधिकाऱ्यांसोबत बोलत नाहीत. पक्षापेक्षा इतर कामांमध्येचे ते जास्त व्यस्त असतात. मात्र आता हे यापुढं खपवून घेतलं जाणार नाही. तुमच्याकडे वेळ नसेल तर खुर्ची काढून घेतली जाईल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना बजावलं.
या शिबिरात अजित पवार म्हणाले, आता परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडिया प्रचंड ॲक्टिव्ह झाला आहे. तुमच्या बारीकसारीक हालचालींवर सर्वांचं लक्ष असते. मागचे पुढचे संवाद काढून ट्रोल केलं जातं. त्यामुळं बदललेल्या काळासोबत राष्ट्रवादी (NCP) पक्ष म्हणून आपणही बदललं पाहिजे. सर्वांची शिबिराची वेळ सकाळी साडेनऊ वाजताची दिली होती. याचं नियोजन आधीपासूनच केलं होतं. सर्वांना याची माहिती दिली होती. त्यानंतरही अनेक जण उशिरा आले. यापुढं बैठका घेताना वेळ संपल्याबरोबर आपण विमानप्रामाणे सभागृहाचे दरवाजे बंद केले पाहिजे असं गमतीनं सांगताना त्यांनी लेटलतिफ नेत्यांना चांगलंच खडसावलं.
पक्ष तुम्हाला वर्षातून एक दिवस मागतो. तोसुद्धा तुम्हाला देता येत नसेल तर हे बरोबर नाही. तुम्हाला नेमून दिलेल्या जिल्हे व तालुक्यांमध्ये जावंच लागेल. पालकमंत्र्यांनी फक्त एक मे, 15 ऑगस्ट व 26 जानेवारीशिवाय जावं, तेथील आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करावी, लोकांमध्ये फिरावं. त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात असंही अजितदादांनी म्हटलं. काही मंत्री जातात, मात्र तेथील जिल्हाध्यक्षांना विचारतसुद्धा नाही. ते सुद्धा आपल्याच परिवारातील घटक आहेत, असे करून चालणार नाही. आजवर ज्या चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त कराव्या लागतील. ज्यांना हे जमणार नाही, त्यांना खुर्ची रिकामी करावी लागेल, असा गर्भित इशाराही यावेळी दादांनी आपल्याच पक्षाच्या मंत्री अन् नेत्यांना दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज आयोजित करण्यात आलेलं शिबिर फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. फक्त भाषणं करुन चालणार नाही. आपल्याला काही ठोस निर्णय घ्यायचे आहेत. याकरिता आपण ग्रुप डिस्कशन करून त्यातून नव्या योजना, संकल्पना व धाडसी विचार पुढे आणा. त्याची अंमलबाजणी कालमर्यादेत कशी करता येईल हे बघा. शिबिराच्या समारोपात ‘नागपूर करार’ आपण जाहीर करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फक्त निवडणुका आल्या की येतात, दिसतात असं होऊ देऊ नका. रोज जनतेसोबत राहा. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट राहा, असा सल्लाही यावेळी अजित पवारांनी दिला.