मुंबईच्या मुंबादेवी मतदारसंघात झालेल्या राजकीय घडामोडींनी महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार गटाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. मुंबादेवी येथील शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाच्या तब्बल २०० पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

महाविकास आघाडीला मोठा धक्का मुंबादेवी येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटातील समन्वयक फैजुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देत अजित पवार गटाचा झेंडा हाती घेतला.
गटबांधणीतील नवीन मोर्चेबांधणी मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार स्पर्धा सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आपल्या ताकदीची पुन्हा एकदा जुळवाजुळव करत आहेत. परंतु महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाला लागलेली गळती चिंतेचा विषय ठरत आहे.












