Bihar Election 2025 promises for women : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि महाआघाडीनं आपापले जाहीरनामे जाहीर करत प्रचारयुद्धाची दिशा ठरवली आहे. दोन्ही आघाड्यांचा स्पष्ट फोकस आहे महिला मतदार आणि तरुणाई. मागील निवडणुकीत महिलांनी एनडीएला मोठं यश मिळवून दिलं होतं, त्यामुळं यावेळी दोन्ही पक्षांनी त्यांच्या मतांचा केंद्रबिंदू महिलांच्या विकासावर ठेवला आहे. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आणि “लखपती दीदी” या उपक्रमांद्वारे एनडीएनं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं वचन दिलं आहे. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीनं “माई बहिण योजना”द्वारे प्रत्येक महिलेला थेट आर्थिक लाभ देण्याचं आश्वासन देत या स्पर्धेत स्वतःची ताकद दाखवली आहे.
तरुणाई आणि रोजगार, दोन्ही गटांचा निवडणूक मंत्र :
महिलांनंतर सर्वाधिक लक्ष युवकांवर केंद्रीत झालं आहे. एनडीएनं बिहारला “जागतिक कौशल्य केंद्र” बनवण्याचा संकल्प करत प्रत्येक जिल्ह्यात मेगा स्किल सेंटर्स आणि 10 नवीन इंडस्ट्रियल पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. एक कोटींपेक्षा जास्त रोजगार निर्माण करण्याचं वचन देत त्यांनी विकासाचा नवा रोडमॅप दाखवला आहे. तर महाआघाडीनं ‘प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी’ देण्याचं आणि 20 दिवसांच्या आत कायदा करुन नोकऱ्यांची प्रक्रिया सुरु करण्याचं वचन दिलं आहे. बेरोजगार तरुणांना दरमहा 2 ते 3 हजार रुपये भत्ता देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळं बिहारमधील युवा मतदारांचा ओढा कोणत्या गटाकडे वळतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शेतकऱ्यांच्या मतांवरही लक्ष :
महिला आणि तरुणाईसोबत शेतकरी हा निवडणुकीतील तिसरा निर्णायक घटक मानला जातो. एनडीएनं सर्व पिकांसाठी हमीभाव देण्याचं, पीएम किसान सन्मान निधी 6 हजारांवरुन 8 हजारांपर्यंत वाढवण्याचं आणि 1 लाख कोटींची कृषी गुंतवणूक करण्याचं वचन दिलं आहे. महाआघाडीनंही मागे न राहता सर्व पिकांसाठी हमीभाव, बाजार समित्या पुनरुज्जीवित करणं आणि शेतकऱ्यांना 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. यासोबत पारंपरिक व्यवसायातील कारागिरांना 5 लाखांचं व्याजमुक्त कर्ज देण्याचं आश्वासन देत ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडणुकीची लढत आता जाहीरनामा विरुद्ध जाहीरनामा (Bihar Election 2025 promises for women)
बिहारमध्ये आता राजकीय प्रचाराचा केंद्रबिंदू व्यक्ती नव्हे तर घोषणा ठरल्या आहेत. महिला, तरुण आणि शेतकरी या तिन्ही वर्गासाठी मोठमोठी आश्वासनं दिल्यानंतर, मतदारांनी कोणत्या पक्षाच्या वचनांवर विश्वास ठेवायचा हा प्रश्न महत्वाचा ठरणार आहे. दोन्ही आघाड्यांनी विकासाचं स्वप्न दाखवलं आहे, पण या वचनांना वास्तवात उतरण्याचं आश्वासन कोण पाळेल, हे निकालच ठरवणार आहे








