Gujarat formula Maharashtra cabinet : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय खळबळ होण्याची चिन्हं दिसत आहेत. गुजरातप्रमाणेच आता महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही वादात सापडलेले आणि कामगिरीत कमी पडलेले मंत्री यांची खुर्ची धोक्यात आली आहे. पुढील काही महिन्यांत सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन होणार असून, अपेक्षेनुसार काम न करणाऱ्यांना ‘विश्रांती’ मिळू शकते. या हालचालींमुळं महायुती सरकारमधील अनेक मंत्री चिंतेत आहेत.
गुजरातनंतर आता महाराष्ट्रात ‘नवा प्रयोग’? :
भाजपानं नुकताच गुजरातमध्ये धक्कादायक निर्णय घेत सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. फक्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या खुर्चीवर गंडांतर आलं नाही. दुसऱ्याच दिवशी 25 आमदारांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं, ज्यात बरेचजण नवखे होते. आता याच पद्धतीचा ‘गुजरात फॉर्म्युला’ महाराष्ट्रात लागू होऊ शकतो, अशी चर्चा जोरात सुरु आहे. राज्यातल्या सध्याच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पुढील टप्प्यात ‘बदल’ केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते.
भाजपाचा प्लॅन काम नसेल तर पद नाही :
भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं स्पष्ट संकेत दिले आहेत की, प्रत्येक मंत्र्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, पण जे कामगिरीत मागे राहतील, त्यांना जागा सोडावी लागेल. हा निर्णय केवळ शिस्त राखण्यासाठीच नव्हे तर पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला नवा चेहरा देण्यासाठी घेतला जात आहे.
वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची तलवार :
एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांच्या एनसीपी गटातील काही मंत्री गेल्या काही महिन्यांत विविध वादांमध्ये अडकले आहेत. त्यांच्या वर्तणुकीमुळं महायुती सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. आतापर्यंत फक्त धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं खळबळ माजली असली तरी, इतर काही मंत्र्यांवरही पुढील टप्प्यात कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे हि वाचा : City name change Maharashtra 2025 : राज्यातील मोठ्या शहराचं बदललं नाव; काय आहे नवीन नाव?
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं समीकरण :
सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 39 सदस्य आहेत, त्यापैकी 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री. भाजपाकडे 19 मंत्री, शिंदे गटाकडे 11 आणि अजित पवार गटाकडे 9 मंत्री आहेत. पण ‘परफॉर्मन्स रिव्ह्यू’नंतर हे समीकरण बदलू शकतं. गुजरातनंतर महाराष्ट्रात भाजपानं ‘नवा चेहरा, नवी टीम’ या धोरणावर भर दिल्यास, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.











