छ. संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर मधील गॅलॅक्सी रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुरग्रस्तांच्या मदतीवरून राज्यसरकारचे वाभाडे काढले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना 100 टक्के मदत हवी होती, ती सरकारने दिली नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करून राज्यसरकार ने जाहीर केलेले पॅकेज शेतकऱ्यांना मान्य नसेल तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शेतीसोबत नोकरी करा
मोठमोठी संकटे येत असल्याने शेती उध्वस्त होत आहे. त्याचा शेतकऱ्याला फटका बसत आहे. इतर समाजाला शेतीसोबत नोकरीचा आधार आहे. पण मराठ्यांना नाही. त्यामुळे मराठ्यांचे आरक्षण टिकवलं पाहिजे. बाकीच्या मराठ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांनी शेतीसोबत नोकरी करावी. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ध्यानात ठेवून येणाऱ्या 2029 च्या निवडणुकीत धडा शिकवण्याचे, त्यांना पाडण्याचे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.
अजित पवारांनी साप पाळलेत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांवर गंभीर आरोप करत जरांगे पाटील म्हणाले, अजितदादांनी आणि राष्ट्रवादीने मराठ्यां विरोधातील साप पाळले आहेत. पक्षातील भुजबळ सारखे नेते सतत मराठ्यां विरोधात बोलत आहेत. भुजबळ बावचळले आहेत, त्यांना वाईट दिवस येणार आहेत. ते मराठ्यांचा शक्य तितका अपमान करत आहेत. राष्ट्रवादीचे अनेक नेते मराठ्यांविरोधात सक्रिय असून बीड मध्ये मोर्चे देखील आयोजित करतात आणि हा मोर्चा अजित पवार पुरस्कृत आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधक हे बावळट आणि पिसाळलेल्या कुत्र्यासारखे आहेत , अशी जहरी टीकाही केली.
दिल्लीचा लाल्या म्हणत राहुल गांधींवर हल्ला
विजय वडेट्टीवार सारखे नेते मराठ्यांच्या विरोधात आहेत. दिल्लीच्या लाल्याच्या सांगण्यावरून महाराष्ट्रातील काँग्रेस नेते भूमिका घेत आहेत असे म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर टीका केली. वडेट्टीवार यांना राजकारणात स्थिरावायच असल्यामुळे ते मराठ्यांविरोधात मोर्चे काढत आहेत. OBC चे मोर्चे असण्याऐवजी हे काँग्रेस चे मोर्चे आहेत. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांच्या पाठिंब्याशिवाय हे घडू शकत नाही असा आरोप त्यांनी केला. या लोकांना विदर्भातील मराठे-कुणबी धडा शिकवतील असेही ते म्हणाले.