कर्नुल : आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील चिन्ना टेकूरजवळ हैदराबादहून बेंगळुरुला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सच्या एसी बसला आग लागल्यानं किमान 20 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसची खिडकी तोडून आणि बसमधून उड्या मारुन सुमारे 21 जणांनी आपला जीव वाचवला. जे पळून जाऊ शकले नाहीत ते जळून मृत्युमुखी पडले. आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली. मोटारसायकलला धडकल्यानंतर काही मिनिटांतच बसमधून इंधन गळती होऊन आग लागली. यात 20 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे, तर 11 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं :
हैदराबादहून निघालेली बस कर्नुल शहराच्या बाहेरील उलिंडाकोंडाजवळ येताच मागून येणाऱ्या दुचाकीनं बसला धडक मारली. दुचाकी बसखाली गेल्यानंतर इंधन टाकीला दुचाकी धडकली. त्यानंतर आग लागून संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अपघात झाल्यानंतर लागलेल्या आगीमुळं गाढ झोपेत असलेले प्रवासी जागे झाले. काही जण ओरडत बाहेर आले. तर अनेक जण आगीत अडकले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. जखमींना कर्नुल जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. संपूर्ण बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. अपघातामध्ये बहुतेक प्रवासी हैदराबाद शहरातील असल्याची माहिती आहे.
PM Narendra Modi: “Extremely saddened by the loss of lives due to a mishap in Kurnool district of Andhra Pradesh. My thoughts are with the affected people and their families during this difficult time. Praying for the speedy recovery of the injured. An ex-gratia of Rs. 2 lakh… pic.twitter.com/SK0RmClDIk
— ANI (@ANI) October 24, 2025
घटनेचा तपास सुरु :
जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये दोन चालकांसह 41 जण होते. सध्या 21 जणांना शोधण्यात आलं आहे आणि उर्वरित 20 पैकी 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन्ही चालक फरार आहेत. आग लागल्यानंतर बसचा दरवाजा बंद असल्याचं वृत्त आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. बस पूर्णपणे जळाली होती. जखमींना कर्नूल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि घटनेचा तपास सुरु आहे.
Andhra Pradesh | Kurnool bus tragedy: Kurnool District Collector Dr A Siri says, “The accident occurred between 3 and 3:10 am when the bus collided with a bike, causing a fuel leak that led to the fire. Out of the 41 passengers, 21 have been rescued safely. Among the remaining… https://t.co/9yQWx8pzOC
— ANI (@ANI) October 24, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त :
पंतप्रधान मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं की, “आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात झालेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल मला खूप दुःख झालं आहे. या कठीण काळात बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्याची मी प्रार्थना करतो.” तसंच पंतप्रधान मदत आणि आपत्ती निवारण निधीतून मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देखील देण्यात आली आहे.
हे हि वाचा : दिवाळीत फटाके फोडल्याने वेगवेगळ्या भागात लागली आग; पुण्यात देखील विविध ठिकाणी लागली आग, मालमत्तेचे नुकसान
राष्ट्रपती मुर्मू यांनीही केला शोक व्यक्त :
कर्नूलमध्ये बसला लागलेल्या आगीच्या दुःखद घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, “या अपघातात झालेलं जीवित आणि मालमत्तेचं नुकसान अत्यंत दुर्दैवी आहे. मी शोकग्रस्त कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करते.”












