नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुसंगती आणण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. यानुसार, यापुढं टपाली मतपत्रिकांची मोजणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (EVM) निकालापूर्वी न होता, मोजणीच्या शेवटून दुसऱ्या फेरीत केली जाणार आहे. आतापर्यंत टपाल मतं मोजणीच्या सुरुवातीलाच घेतली जात होती.
का करण्यात आला बदल?
अलीकडेच 85 वर्षांवरील ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग नागरिकांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यानं टपाली मतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत, मोजणीच्या सुरुवातीला टपाल मतपत्रिका हाताळल्यास गोंधळ आणि विसंगती निर्माण होऊ शकत होती. त्यामुळं पूर्ण प्रक्रियेतील स्पष्टता टिकवण्यासाठी आयोगाने ही पद्धत बदलली आहे.
मोजणीच्या वेळापत्रकातील बदल
मतमोजणीच्या दिवशी सकाळी आठ वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरु होते, तर साडेआठ वाजल्यापासून ईव्हीएम मोजणीला सुरुवात होते. यापूर्वीच्या नियमानुसार दोन्ही प्रक्रिया एकमेकांपासून स्वतंत्रपणे पार पडत होत्या, ज्यामुळं काहीवेळा ईव्हीएम मोजणी पूर्ण होऊनही टपाल मतं शिल्लक राहायची. आता मात्र ईव्हीएमच्या शेवटून दुसरी फेरी टपाली मतपत्रिका मोजणी पूर्ण झाल्यानंतरच होईल.
अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी
ज्या मतदारसंघात टपाल मतांची संख्या जास्त असेल, तिथं मोजणीसाठी पुरेसे टेबल आणि कर्मचारी उपलब्ध करुन देणं ही थेट मतमोजणी अधिकाऱ्याची जबाबदारी असेल. विलंब टाळण्यासाठी आवश्यक सर्व तयारी वेळेत करण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत.
निवडणूक प्रक्रियेत सुधारणा
गेल्या सहा महिन्यांत आयोगानं पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक सुधारणा राबवल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून टपाली मतपत्रिकांच्या मोजणीतील हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयामुळं निकाल प्रक्रियेतील गोंधळ कमी होईल आणि मतदारांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.