आजच्या डिजिटल जगात इंटरनेट म्हणजेच दैनंदिन आयुष्याचा श्वास आहे. ऑनलाइन पेमेंट्सपासून बँकिंग, शिक्षण, व्यापार आणि मनोरंजन – सगळं काही इंटरनेटवर अवलंबून आहे. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका मोठ्या घटनेमुळे लाखो वापरकर्त्यांना इंटरनेट बंद पडण्याचा अनुभव घ्यावा लागत आहे. जगभर इंटरनेटचे जाळे विणण्यासाठी समुद्रात ही सागरी केबल्स टाकले आहेत. त्यातच समुद्रात टाकलेल्या अनेक सागरी ऑप्टिक केबल्स कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जागतिक स्तरावर त्याच्या परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अनेक देशांचे व्यवहार आणि एकमेकांशी संवाद साधायला अडथळे येणार असल्याचे म्हंटले जात आहे.
रविवारी हिंदी महासागरातील लाल समुद्र परिसरात असलेल्या पाण्याखालील फायबर ऑप्टिक केबल्स तुटल्या, ज्यामुळे आशिया आणि मध्य पूर्वेतील इंटरनेट सेवा ठप्प झाली असून या घटनेचा फटका भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया, कतार, यूएई यांसारख्या अनेक देशांना बसला आहे. यात तुटलेल्या केबल्समध्ये मुख्यत्वे SMW4 आणि IMEWE या दोन महत्त्वाच्या प्रणालींचा समावेश असून SMW4 ही भारतातील टाटा कम्युनिकेशन्सद्वारे चालवली जाते. भारतीय कंपनी टाटा यांसाठी सामग्री पुरवते. या तुटीमुळे इंटरनेट वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. इंटरनेटचा वेग प्रचंड कमी झाला असून UPI, ऑनलाइन पेमेंट आणि बँकिंग सेवा यांसारख्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागतं आहे. तसेच कॉल ड्रॉप्स वाढल्याने आंतरराष्ट्रीय व्हिडिओ कॉल आणि कॉन्फरन्सिंग कामांमध्ये अडथळा येत आहे.
समुद्रात अनेक जहाज ये-जा करत असताना मोठ्या जहाजांच्या अँकरमुळे पाण्याखालच्या केबल्स कापल्या गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, काही जुन्या अहवालांनुसार काहीतरी हेतू ठरवून यमनमधील हुथी बंडखोर अशा प्रकारच्या कारवाया करू शकतात. मात्र, त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली नाही त्यामुळे अद्याप ऑप्टिक केबल्स कशा तुटल्या असतील याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. समुद्रात खोलवर या ऑप्टीक केबल्सचे जाळे पसरले असल्यामुळे पाण्याखालील केबल्स दुरुस्त करणे सोपं काम नाही. त्यात समुद्र हद्दीत असलेल्या देशांच्या परवानग्या आवश्यक असतील. तसेच, यासाठी विशेष जहाजे, प्रशिक्षित तज्ज्ञ लागतील ज्याचा दुरुस्तीचा कालावधी काही महिनेही असून शकतो.
भारत–पाकिस्तानसह आशियातील मोठा भाग यामुळे प्रभावित झाला असून, येत्या काही दिवसांत त्याचा परिणाम बँकिंग, व्यापार आणि दैनंदिन व्यवहारांवर अधिक प्रमाणात स्पष्ट दिसून येईल. जागतिक पातळीवर अशा अधोसंरचनेच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणं ही आता काळाची गरज आहे.
प्रीती हिंगणे (लेखिका)