लहानपणापासून पाहिलेले स्वप्न आणि उराशी बाळगलेला संयम माणसाला कुठल्या प्रगतीपथावर नेऊन पोहचवतो, त्याचे साक्षात उदाहरण म्हणजे, क्रिकेटचा प्रिन्स नावाने सजलेला भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज ज्याचे नाव आहे शुभमन गिल. 8 सप्टेंबर 1999 ला पंजाबमध्ये जन्मलेल्या शुभमनाला क्रिकेटचे धडे हे त्याच्या वडिलांकडूनच मिळाले. त्याच्या वडिलांनाही भारताकडून क्रिकेट खेळायचे स्वप्न होते ; परंतु काही कारणास्तव त्यांना ह्या क्षेत्रात अपयश आले. परंतु त्यांनी धीर न सोडता , त्यांचे स्वप्न शुभमनला दिले आणि स्वतःला त्याच्यात पाहून त्यांनी त्याला क्रिकेट शिकविले. पुढे ते प्रशिक्षणासाठी शुभमनसोबत मोहालीत राहायला गेले. तेथेच त्याला पंजाब संघाकडून खेळायची संधी मिळाली. पुढे जाऊन त्याने अंडर -16 स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
2016-2017 मध्ये विजय हजारे स्पर्धांमध्ये पदार्पण करीत पुढच्याच वर्षी त्याने रणजी स्पर्धेत खेळायची संधी मिळवली. ह्या दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. पुढे जाऊन देवधर स्पर्धेमध्ये तो इंडिया-सी कडून देखील खेळला. तसेच ह्या स्पर्धेतही त्याची मेहनत दिसली आणि त्याची निवड ही 2018 च्या अंडर -19 च्या विश्वचषकात उपकर्णधार म्हणून झाली. मिळालेल्या ह्या संधीलाही त्याने वाया न जाऊ देता, पाकिस्तान विरुद्ध उपांत्य फेरीत नाबाद 102 धावा करून तो स्टार खेळाडू बनला. तसेच पुढे जाऊन ऑस्ट्रेलिया सोबत भारताने 2018 चा अंडर -19 चा विश्वचषक जिंकला. त्याने ह्या पूर्ण विश्वचषकाच्या सामन्यात 124.00 च्या सरासरीने 372 धावा केल्या. आणि ह्या माध्यमातून त्याच्यावर जगातली सर्वात महागडी असलेली क्रिकेट स्पर्धा अर्थात आयपीएल मध्ये कोलकत्ता संघाकडून त्याच्यावर बोली लागली. तिथेही त्याने चांगले प्रदर्शन केले. आणि ह्या प्रदर्शनाच्या जोरावर त्यापुढील भारतीय संघाचे दार हे खुले झालीत. आणि मग काय , तिथेही तोच शुभमन आपल्याला पाहायला मिळाला. एकदिवसीय, कसोटी, आणि 20-20 मध्ये जिथेही त्याला संधी मिळाली तिथे त्याने आपले नाव दाखवून दिले. शुभमनचे फक्त 2023 चे विश्वचषक जिंकायचे स्वप्न हे अपूर्ण राहिले आणि त्याची खंत आजही पूर्ण भारत देश जाणतो.
आपल्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न त्याने सत्यात उतरवले होते. शुभमनच्या वडिलांनी स्वतःला शुभमन मध्ये पाहिले होते आणि जाणले होते की, आपले स्वप्न सत्यात फक्त शुभमनच उतरवू शकतो. असे म्हणायला वावगे ठरणार नाही की, सुनील गावस्कर नंतर सचिन तेंडुलकर तसेच त्याच्यानंतर विराट कोहली आणि आता शुभमन गिलचे नाव घ्यायला काही हरकत नाही. जो दिमाख आपल्या भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांसमोर अगोदर पासून निर्माण करून ठेवला होता तोच दिमाख आज रोहित आणि विराटच्या अनुपस्थित शुभमनने राखून ठेवला आहे. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे आताची 2025 ची अँडरसन – तेंडुलकर कसोटी स्पर्धा. ही स्पर्धा घोषित झाली आणि समोर एक दुःखद घटना आली की , रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली. मग काय , सगळीकडे एकच चर्चा की, पुढचा कर्णधार कोण ? आणि संघाचे नेतृत्व करेल कोण ? मग अनेक दिगज्जांचे नाव समोर आलेत, परंतु शुभमनची प्रतिभा ही माहित असल्याने त्यालाच भारतीय संघाचा पुढील कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. आणि त्या नावाला त्याने सिद्ध देखील करून दाखवले. कर्णधारपदाची जबाबदारी घेत त्याने आपल्या पहिल्या सामन्यात 147 धावा आणि दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध 269 धावा केल्या. गिलच्या ह्या द्विशतकाने अनेक विक्रम मोडीत काढले. कर्णधार म्हणून भारताकडून सर्वोच्च खेळीचा विक्रमही आता गिलच्या नावे झाला आहे. त्याने हा विक्रम रचून विराट कोहलीला मागे टाकले आहे. तसेच इंग्लंडमध्ये भारताकडून सर्वोत्तम खेळीही आता गिलने साकारली आहे . 1979 मध्ये ओव्हलवर सुनील गावस्करांचा 221धावांचा मागील 46 वर्षांचा अबाधित राहिलेला विक्रम गिलने मोडीत काढून इतिहासचं रचला आहे.
ही तर केवळ सुरुवात आहे एका नव्या अध्यायाची. जी प्रेरित करते अनेक लोकांना की, स्वप्ने बघायची कधी थांबवायची नाहीत. मनाशी बाळगलेल्या अनेक इच्छा ह्या फक्त व्यक्त न करता त्यांना पूर्ण करण्यासाठी झटत राहावे हेच शुभमन कडून शिकता येते. कुणी तरी आपल्यावर ठेवलेला विश्वास हा सत्यात कसा उतरवता येईल, त्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील आणि त्यास पुढे कितपत आपल्याला वाढवता येईल ह्याची प्रचिती आपल्याला शुभमनच्या मेहनतीकडे पाहूनच दिसते.