अबुधाबी : भारतीय क्रिकेट संघानं आशिया कप 2025 च्या त्यांच्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात ओमानचा 21 धावांनी पराभव केला. या सामन्यात ओमाननं भारताला कडवी झुंज दिली, पण शेवटी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 188 धावा केल्या. ओमानला फक्त 167 धावा करता आल्या. दरम्यान अर्शदीप सिंगनं सामन्यात एक विकेट घेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला.
अर्शदीप सिंगचं टी-20 विकेटचं शतक : अर्शदीप सिंगनं 2025 च्या आशिया कपमध्ये पहिला सामना खेळला. त्यानं ओमानविरुद्धच्या सामन्याच्या 20व्या षटकात विनायक शुक्लाची विकेट घेतली. यासह त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या. तो टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी कोणत्याही भारतीयाने ही कामगिरी केली नव्हती. तसंच तो जागतिक टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी सामन्यात 100 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला. अफगाणिस्तानचा रशिद खान आणि वनिंदू हसरांगा यांनी अर्शदीपपेक्षा कमी सामन्यात हा पराक्रम केला आहे. पण ते फिरकीपटू आहेत.
T20I मध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारे गोलंदाज (सर्व देश) :
राशिद खान (अफगाणिस्तान) – 53 सामने
संदीप लामिछाने (नेपाळ) – 54 सामने
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) – 63 सामने
अर्शदीप सिंग (भारत) – 64 सामने
रिझवान बट (बहरिन) – 66 सामने
हरिस रौफ (पाकिस्तान) – 71 सामने
2022 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण : अर्शदीप सिंगनं 2022 मध्ये भारतीय संघासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि तेव्हापासून तो भारतीय गोलंदाजी आक्रमणात एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानं भारतीय संघासाठी 64 टी-20 सामन्यांमध्ये एकूण 100 बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 9 धावांत 4 बळी ही आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा विजय : ओमानविरुद्ध भारतीय संघाकडून संजू सॅमसननं चांगली फलंदाजी केली. त्यानं 45 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांसह 56 धावा केल्या. अभिषेक शर्मानंही 38 धावा केल्या. तिलक वर्मानं 29 धावांचे योगदान दिलं. या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाला 188 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. ओमानकडून आमिर कलीमनं 64 धावा आणि हम्माद मिर्झानं 51 धावा केल्या, परंतु हे खेळाडू ओमानला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.