ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने बुधवारी चाहत्यांना आनंदाचा डबल डोस दिला. पुरुष आणि महिला संघांनी एकाच दिवशी न्यूझीलंडला पराभूत करत विजयाची नवी कहाणी लिहिली. एका बाजूला पुरुष संघाने टी20 मालिकेत 6 विकेट्सने मात केली, तर दुसऱ्या आघाडीवर महिला संघाने वर्ल्डकप सामन्यात तब्बल 89 धावांनी विजय मिळवत आपला दबदबा सिद्ध केला.
पुरुष संघाचा दमदार विजय:
टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली. न्यूझीलंडने 20 षटकांत 6 गडी गमावत 181 धावा उभारल्या आणि प्रतिस्पर्ध्यांसमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जोरदार सुरुवात करून सामना सोपा केला. केवळ 16.3 षटकांत 4 गडी राखून लक्ष्य गाठत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली. विशेष म्हणजे 182 धावा करताना 23 चेंडू शिल्लक ठेवत ऑस्ट्रेलियाने विक्रम केला. आतापर्यंत 180 पेक्षा जास्त धावांचं आव्हान सर्वात कमी चेंडूत पूर्ण करण्याचा मान पाकिस्तानकडे होता.
महिला संघाचाही झंझावात:
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 च्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर आपली पकड घट्ट केली. टॉस जिंकून फलंदाजी घेतलेल्या ऑस्ट्रेलियन महिलांनी 49.3 षटकांत सर्वबाद 326 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 237 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 89 धावांनी मोठा विजय मिळवला. या निकालानंतर ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं असून नेट रनरेटही +1.780 इतका भक्कम केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा वर्चस्वाचा वारसा कायम :
पुरुष आणि महिला संघांनी दाखवलेली विजयी खेळी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट परंपरेला अधोरेखित करणारी ठरली. आयसीसीच्या जवळपास सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये बहुसंख्य ट्रॉफ्या जिंकणाऱ्या या संघाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, कसोटी असो की मर्यादित षटकांचा खेळ, ऑस्ट्रेलिया नेहमीच एक पाऊल पुढे असतो.
एकाच दिवशी झालेल्या या दुहेरी यशामुळे ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा आनंद दुपटीने वाढला आहे.