कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाचा हा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल. दोन्ही संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळतील आणि त्यानंतर टी-20 मालिका होईल. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आता, ऑस्ट्रेलियन संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.
दिग्गजांचं संघात पुनरागमन :
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत. निवड समितीने वनडे आणि टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघांची घोषणा केली आहे. मिचेल स्टार्क वनडे संघात परतला आहे. दुखापतीमुळं मागील मालिकेपासून बाहेर असलेला मॅट शॉर्टही पुनरागमन करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात दुखापतग्रस्त झालेला मिच ओवेन आता पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर संघात परतला आहे. मार्नस लाबुशेनला संघातून वगळण्यात आले आहे.
3 वर्षांनंतर या खेळाडूचं पुनरागमन :
मॅथ्यू रेनशॉचाही वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. 2022 नंतर हा त्याचा पहिलाच पुनरागमन आहे. रेनशॉनं ऑस्ट्रेलिया अ आणि क्वीन्सलँडसाठी शानदार कामगिरी केली आहे. अॅलेक्स केरी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळू शकणार नाही कारण तो अॅडलेड ओव्हल इथं क्वीन्सलँडविरुद्ध शेफील्ड शिल्डचा दुसरा फेरीचा सामना खेळणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत जोश इंग्लिस यष्टीरक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल.
जोश इंगलिस आणि नॅथन एलिस टी-20 संघात परतले आहेत. इंगलिस दुखापतीतून बरा झाला आहे, तर एलिस त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर संघात परतला आहे. मात्र ग्लेन मॅक्सवेल न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान मनगटाच्या फ्रॅक्चरमुळं बाहेर आहे. अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन वनडे मालिकेनंतर पश्चिम ऑस्ट्रेलियासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळून कसोटी हंगामाची तयारी सुरू ठेवेल.
ऑस्ट्रेलियन वनडे संघ :
मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा.
ऑस्ट्रेलियन टी-20 संघ (पहिले दोन सामने) :
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा.