दुबई : 2025 च्या आशिया कपमधील शेवटचा ग्रुप-बी सामना 18 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघात खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं 6 विकेट्सनं विजय मिळवत सुपर-4 मध्ये आरामात स्थान मिळवलं. मात्र या सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेल्या 22 वर्षीय अष्टपैलू दुनिथ वेल्लालेजला दुःखद बातमी मिळाली. दुनिथचे वडील सुरंगा वेल्लालेज यांचं 18 सप्टेंबर रोजी निधन झाले. सामन्यानंतर दुनिथला याची माहिती मिळाली आणि तो थेट घरी परतला.
नबीनं एकाच षटकात मारले 5 सिक्सर : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान वडिलांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेलालेजला सपोर्ट स्टाफकडून सांत्वन मिळत असल्याचं दिसून आलं. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना दुनिथसाठी निराशाजनक होता, त्यानं त्याच्या चार षटकांमध्ये 49 धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली. या सामन्यादरम्यान, अनुभवी अफगाण खेळाडू मोहम्मद नबीनं त्याच्या एका षटकात पाच षटकार मारले.
श्रीलंकेचा तिसरा विजय, सुपर-4 मध्ये प्रवेश : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं स्पर्धेत आपली विजयी लय कायम ठेवत हा सामना सहज 6 विकेट्सनं जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्ताननं 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. मोहम्मद नबीनं 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर कर्णधार रशीद खाननं 24 धावा केल्या. गोलंदाजीत श्रीलंकेकडून नुवान तुषारानं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कुसल मेंडिसनं 74 धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळं श्रीलंकेच्या संघाला 18.4 षटकांत लक्ष्य गाठता आलं. 20 सप्टेंबर रोजी सुपर-4 मध्ये श्रीलंका बांगलादेशविरुद्ध खेळेल.
वेलागेच्या स्पर्धेत सहभागावर प्रश्नचिन्ह : या तरुण क्रिकेटपटूच्या दुःखामुळं श्रीलंकेच्या आशिया कपमधील सलग तिसऱ्या विजयावर विरजण पडलं. संघानं शानदार कामगिरी करत शेवटच्या लीग सामन्यात अफगाणिस्तानला हरवलं आणि पराभवाशिवाय सुपर-4 मध्ये प्रवेश केला. मात्र त्याच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने वेलागेच्या स्पर्धेत सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. श्रीलंकेचा पुढील सामना 20 सप्टेंबर रोजी बांगलादेश, 23 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि 26 सप्टेंबर रोजी भारताशी होणार आहे.