कोलंबो : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा नववा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघांमध्ये कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियानं हा सामना 107 धावांनी जिंकला आणि त्यांचा दुसरा विजय नोंदवला, ज्यामुळं गुणतालिकेत महत्त्वपूर्ण बदल झाला. सामन्याच्या एका टप्प्यावर, ऑस्ट्रेलियन महिला संघानं 115 धावांत आठ विकेट गमावल्या होत्या. मात्र बेथ मूनीनं अलाना किंगसह संघाची धावसंख्या 221 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी महिला संघ 114 धावांवर बाद झाला.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची खराब सुरुवात :
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 222 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. त्यांनी फक्त 31 धावांत पाच विकेट गमावल्या. सिद्रा अमीननं थोडक्यात किल्ला सांभाळला असला तरी, ती देखील 52 चेंडूत 35 धावा करुन बाद झाली. सिद्राशिवाय, इतर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. या पराभवासह, पाकिस्तान महिला संघ आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी प्रभावी होती. ऑस्ट्रेलियाकडून किम गार्थनं शानदार कामगिरी केली आणि तीन विकेट घेतल्या. मेगन शट आणि अॅनाबेल सदरलँडनंही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर अॅशले गार्डनर आणि जॉर्जिया वॉरहोम यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.
फलंदाजीत खराब सुरुवात केल्यानंतर कांगारुंचं पुनरागमन :
कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध बेथ मूनी ऑस्ट्रेलियासाठी तारणहार म्हणून उदयास आली, तिनं वर्षानुवर्षे लक्षात ठेवली जाणारी खेळी खेळली. तिच्या पाचव्या वनडे शतकासह, बेथ मूनीनं ऑस्ट्रेलियाला केवळ संकटातूनच बाहेर काढलं नाही तर पाकिस्तानचा पराभव निश्चित वाटणाऱ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. मूनीनं 114 चेंडूत 11 चौकार मारत 109 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर ती बाद झाली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना, मुनीनं ऑस्ट्रेलियाला 7 बाद 76 धावसंख्येपासून संघाला 9 बाद 221 धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.
नवव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी :
दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अलाना किंगसोबत नवव्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावली. अलाना 49 चेंडूत नाबाद 51 धावांवर राहिली, तिनं तीन षटकार आणि तीन चौकार मारले. मुनीनं आठव्या विकेटसाठी किम गार्थ (11) सोबत 39 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियावनं एकवेळ 21.2 षटकांत 7 विकेट गमावल्यानंतर 50 षटकांत 9 बाद 221 धावसंख्येपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून नशरा संधूनं तीन, कर्णधार फातिमा साना आणि रमीन शमीमने प्रत्येकी दोन आणि डायना बेग आणि सादिया इक्बालनं प्रत्येकी एक बळी घेतला.