पर्थ : पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या मध्यातच पावसामुळं सामना थांबवावा लागला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचं सिद्ध झालं आहे. कारण भारताचे अव्वल तीन फलंदाज अवघ्या 25 धावांवर बाद झाले.
रोहित-विराट स्वस्तात बाद :
सामन्यात सर्वांचं लक्ष वनडेत पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्मा आणि विराटवर होतं. मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली, फक्त 8.5 षटकांत तीन प्रमुख विकेट्स गमावल्या आणि स्कोअरबोर्डवर फक्त 25 धावा जोडल्या. पाऊस येण्यापूर्वी, भारताचे तीन आघाडीचे फलंदाज, रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार शुभमन गिल आधीच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघात परतलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली ही दोन प्रमुख खेळाडू त्यांचं पुनरागमन संस्मरणीय बनवण्यात अपयशी ठरले.
रोहित शर्माचा 500वा आंतरराष्ट्रीय सामना :
हिटमॅन रोहित शर्माचा हा भारतीय जर्सीत 500वा आंतरराष्ट्रीय सामना होता. मात्र 224 दिवसांनंतर वनडेत फलंदाजीला परतलेला रोहित फक्त 16 मिनिटं क्रीजवर टिकला. तो जोश हेझलवूडच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. रोहितनं 14 चेंडूत एका चौकारासह फक्त धावा केल्या आणि त्याचा ऐतिहासिक सामना निराशाजनक पद्धतीनं संपला.
विराट कोहलीनं काढली नाही एकही धाव :
रोहित शर्मानंतर विराट कोहलीही लवकरच बाद झाला. कोहलीला खातंही उघडता आलं नाही आणि तो मिशेल स्टार्कच्या चेंडूवर कॉनॉलीकडे झेलबाद झाला. सात महिन्यांनंतर मैदानात परतल्यानंतर कोहलीचा गोल्डन डक (शून्य) हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. रोहित आणि कोहलीनंतर कर्णधार शुभमन गिल देखील डावाला बळकटी देण्यात अपयशी ठरला आणि नवव्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलनं 18 चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकारांसह 10 धावा करुन बाद झाला.