दुबई : आशिया चषकातील सुपर-4 फेरीचा दुसरा सामना दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम राखत सहा विकेटनं विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं अभिषेक शर्माच्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर हे लक्ष्य 4 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा करत पूर्ण केलं. यासह टीम इंडियानं आशिया चषकातील आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग चौथा सामना जिंकला आहे.
पाकिस्तानची आव्हानात्मक मजल
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजीला येत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. पहिल्या 10 षटकांमध्ये त्यांनी फक्त 1 विकेट गमावत 91 धावा केल्या. यावेळी पाकिस्तान संघ 190 ते 210 धावा काढेल असं वाटत होतं. मात्र 20 षटकांअखेर त्यांचा डाव पाच बाद 171 धावांवर मर्यादित राहिला. संघाकडून सलामीवीर साहबजादा फरहानने अर्धशतक झळकावत सर्वाधिक 58 धावा केल्या. याशिवाय सॅम अयुब (21) मोहम्मद नवाज (21) आणि शेवटच्या षटकांमध्ये फहीम अश्रफ (20) यांनी केलेल्या खेळीमुळं पाकिस्तानला आव्हानात्मक मजल मारता आली. गोलंदाजीत भारताकडून शिवम दुबेनं सर्वाधिक 2 तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र या सामन्यात महागडा ठरला. त्यानं चार षटकात 45 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.
टीम इंडियाची दमदार सलामी
पाकिस्तानने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाला सलामीवीर अभिषेक शर्मा (74) आणि शुभमन गिल (47) यांनी शतकी भागीदारी करत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने डावाच्या पहिल्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केला. या दोघांनी 9.5 षटकात 105 धावांची भागीदारी करत भारतीय संघाचा विजयाचा पाया रचला. मात्र यानंतर सूर्यकुमार यादव (0) आणि संजू सॅमसन (13) हे मधल्या फळीतील फलंदाज लागोपाठ बाद झाल्यानं संघ काहीसा अडचणीत आला. मात्र शेवटी तिलक वर्मा (30) आणि हार्दिक पांड्या (7) यांनी 26 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. गोलंदाजीत पाकिस्तानकडून हरीस रौफने सर्वाधिक दोन तर अबरार अहमद आणि फहीम अश्रफ यांची प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.