कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषकातील सहावा सामना भारत आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघामध्ये येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताच्या महिला ब्रिगेडनं निर्विवाद वर्चस्व राखत 88 धावांनी विजय मिळवला. यासह टीम इंडियानं स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला असून पाकिस्तानला मात्र दुसऱ्याही सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे भारतीय महिला संघानं पाकिस्तानचा बाराव्यांदा वनडे क्रिकेटमध्ये पराभव केला आहे. पाकिस्तानला भारताविरुद्ध अद्यापही वनडे सामना जिंकता आलेला नाही.
भारतीय संघाची आव्हानात्मक मजल
या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचा आमंत्रण दिलं. यानंतर भारतीय महिला संघानं मिळालेल्या संधीचा फायदा घेत निर्धारित 50 षटकात सर्वबाद 247 धावा केल्या. यादरम्यान टीम इंडियाच्या एकाही फलंदाजांनं अर्धशतकी खेळी केली नसली तरी सर्व फलंदाजांनी उपयुक्त खेळी केली. संघाकडून हरलीन देओलनं सर्वाधिक 46 धावा केल्या. तर ऋचा घोष (35), जेमिमा रॉड्रिंग्स (32) प्रतिका रावल (31) यांनीही छोटेखानी खेळी केली. तर गोलंदाजी पाकिस्तान कडून डीयाना बेगनं सर्वाधिक 4 तर सादिया इकबाल आणि फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.
पाकिस्तानची फलंदाजी अपयशी
टीम इंडियाने दिलेल्या 248 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली. परिणामी संघाचा डाव 43 षटकात 169 धावांवर संपुष्टात आला. संघाकडून सिदारा अमिन हिनं सर्वाधिक 81 धावा केल्या, मात्र उर्वरित फलंदाजांनी तिला साथ दिली नाही. हिच्या व्यतिरिक्त नतालिया परवेझ (33) आणि सिदरा नवाज (14) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. गोलंदाजी भारताकडून क्रांती गौंड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर स्नेह राणानंही दोन विकेट घेतल्या.
हस्तांदोलनं करणं टाळलं
रविवार, 5 ऑक्टोबर रोजी, कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर, विश्वचषकाच्या सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. टॉस दरम्यान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हस्तांदोलन करतील का याकडे सर्वांचं लक्ष होतं. पुरुषांच्या आशिया कपमध्ये पाहिल्याप्रमाणे इथंही असंच घडलं. टॉस दरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी कर्णधारांनी हातमिळवणी केली नाही किंवा डोळ्यांचा संपर्कही केला नाही. सामन्यानंतरही असंच चित्र पाहायला मिळालं.
यासह भारतीय महिला संघानं वनडे विश्वचषकात सर्व पाच सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. केवळ विश्वचषकच नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण 12 वनडे सामने खेळले गेले आहेत आणि भारतीय महिला संघानं ते सर्व सामने जिंकले आहेत.