मुंबई, दि. १५ . २०२५ : गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. राज्यपाल श्री.देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेत पदभार स्वीकारला. या शपथविधी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
या शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्य सचिव राजेशकुमार यांनी श्री.देवव्रत यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
राज्यपाल श्री.देवव्रत यांचा अल्प परिचय :
• नाव : आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात
• वडिलांचे नाव : श्री.लहरी सिंह
• जन्मदिनांक : १८ जानेवारी १९५९
शैक्षणिक पात्रता :
• पदवीधर, पदव्युत्तर (इतिहास आणि हिंदी), बी.एड.
• योगशास्त्रातील डिप्लोमा
• नैसर्गिक चिकित्साशास्त्र व योगिक सायन्समध्ये डॉक्टरेट
अनुभव :
• अध्यापन व प्रशासन क्षेत्रात ४५ वर्षांचा अनुभव.
• १२ ऑगस्ट २०१५ ते २१ जुलै २०१९ या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कार्य.
या कालावधीत नैसर्गिक शेती, गोसंवर्धन, “बेटी बचाओ-बेटी पढाओ”, सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड व जलसंवर्धन अशा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली.
• २२ जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार. गुजरातमध्येच ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला.
• दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.
विशेष आवडी :
• राष्ट्रवादी विचारसरणी व भारतीय संस्कृतीचा प्रसार.
• वैदिक मूल्ये व तत्त्वज्ञान यांवरील व्याख्याने.
• वृत्तपत्रे व मासिकांमध्ये लेखन.
• युवकांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे.
• योग व वैदिक जीवनशैली लोकप्रिय करण्यासाठी कार्यक्रम.
• गोधन संवर्धन व नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिरे.
• एप्रिल २०१५ मध्ये “चमन वाटिका इंटरनॅशनल कन्या गुरुकुल” स्थापन.
• योग, आयुर्वेद व नैसर्गिक उपचार पद्धतींचे प्रशिक्षण व प्रसार.
• वृक्षलागवड व स्वच्छता मोहिमेद्वारे प्रदूषणमुक्त समाजनिर्मिती.
• ग्रंथलेखन.
उल्लेखनीय कार्य :
• १९८१ ते जुलै २०१५ पर्यंत गुरुकुल कुरुक्षेत्रचे प्रधानाचार्य.
या काळात संपूर्ण गुरुकुलाचा कायापालट – आधुनिक सुविधा, नैसर्गिक चिकित्सालय, गोधन संवर्धन केंद्र, १८० एकरवर नैसर्गिक शेती, अर्ष महाविद्यालय, शूटिंग रेंज, इत्यादी.
• आयआयटी, पीएमटी, एनडीए यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण.
परदेश प्रवास :
अमेरिका, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, फ्रान्स, इंग्लंड, इटली, व्हॅटिकन सिटी, नेपाळ, भूतान, सिंगापूर, मॉरिशस, थायलंड इ.
सन्मान व पुरस्कार (निवडक) :
• भारत ज्योती पुरस्कार (२००३)
• अमेरिकन मेडल ऑफ ऑनर (२००२)
• ग्रामीण भारतसेवा सन्मानपत्र (२००५)
• जनहित शिक्षक श्री पुरस्कार (२००९)
• हिमोत्कर्ष राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (२००६)
• अक्षय ऊर्जा पुरस्कार (२०११)
• विशिष्ट सेवा सन्मान, विद्वान रत्न, विविध संस्था व विद्यापीठांकडून मानद डी.लिट. (२०२३)
सदस्यत्वे व पदे (माजी/सध्याची) :
• संस्थापक, चमन वाटिका इंटरनॅशनल कन्या गुरुकुल, अंबाला
• विविध शैक्षणिक, सामाजिक, कृषी, गोसंवर्धन संस्था व मंडळांमध्ये पदाधिकारी
• सध्या – गुजरातचे राज्यपाल (२२ जुलै २०१९ पासून)
• गुजरात सरकारतर्फे अधिपत्याखालील २४ विद्यापीठांचे कुलगुरू
• गुजरात विद्यापीठ, एम.एस. युनिव्हर्सिटी बडोदा, गुजरात कॅन्सर सोसायटी, रेड क्रॉस, सैनिक कल्याण मंडळ, स्काऊट्स अँड गाईड्स यांसारख्या संस्थांचे अध्यक्ष/पदाधिकारी