काल आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने पाकिस्तानाचा दारून पराभव केला. हा सामना रद्द करण्याबाबत मतभेद निर्माण झाले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने या सामन्याला हिरवा झेंडा दाखवून सामन्याच्या खेळीला मान्यता दिली होती. त्यानंतर हा सामना काल चांगलाच रंगल्याचे पाहायला मिळाले. परंतु आता हा सामना फिक्स असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सामना भारताने जिंकल्या नंतर भारतीय क्रिकेट संघाने हा सामना खेळू नये अशी मागणी करण्यात येत होती. हा सामना खेळण्याची खुद्द भारतीय क्रिकेट संघाची इच्छा नव्हती परंतु सरकारच्या दबावामुळे खेळावा लागला असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला असून सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच 25 हजार कोटी काल पाकिस्तानमध्ये या सामन्यानंतर गेली आहे. पाकिस्तान हा पैसे भारताच्या विरोधात वापरणार असून पैशांसाठी एका सामन्यावर बंदी घालू शकत नाही का असेही आरोप त्यांनी केले आहे.
भारत आणि पाकिस्तान सामना हा फिक्स होता, आपण पाकिस्तानला कर्ज मिळू नये, यासाठी प्रयत्न केले परंतु याच सामन्यातून पाकिस्तानला आपण पैसे कमावून दिले, कालच्या सामन्यात दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला. तर संधी असून देखील भाजपने माघार घेतली, भारताने हा सामना खेळून स्वतःची नाचक्की करून घेतली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहे.
संजय राऊत यांनी भारत पाकिस्तान मॅच सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रथम बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणे बंद करावे, तुम्ही शेक हॅन्ड केले नसल्याचे सांगितले परंतु तुम्ही सामना तर खेळलात ना..? हा सामना भारतीय क्रिकेट टीमला खेळायचा नव्हता परंतु सरकारच्या दबावामुळे खेळावा लागल्याचे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली.
भारत आणि पाकिस्तान हा सामना होऊ नये यासाठी राज्यभरातून विरोध करण्यात येत होता. कारण एप्रिल महिन्यात दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला होता, ज्यात 26 निष्पापांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच भारताने पाकिस्तानविरुद्ध सामने खेळणे म्हणजे त्या दहशतवादी हल्ल्याला नजरअंदाज करणे अशा प्रकारे विरोधी पक्षांनी विद्यमान सरकार आणि बीसीसीआय यांच्यावर जोरदार टीका केली होती.
महाराष्ट्रभर शिवसेना (ठाकरे गट) पक्षांनी या सामन्याचा निषेध करण्यासाठी ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन केले होते. ‘माझं कुंकू-माझा देश’ जाहीर करून लोकांना सामन्याचा निषेध करण्याचं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. आज त्यांनी भारत पाकिस्थान मॅच फिक्सिंग करण्यात आल्याचं सांगून सरकारवर ताशेरे ओढले.