दुबई : आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात होणार आहे. आज 28 सप्टेंबर रोजी दुबई इथं जेतेपदाचा सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांनीही त्यांच्या सुपर-4 सामन्यांमध्ये बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
41 वर्षे आणि 16 हंगामांमध्ये असं घडलं नाही :
यंदाच्या स्पर्धेत दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कपच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच एकमेकांसमोर येतील. आशिया कप स्पर्धेच्या 41 वर्षांच्या इतिहासात आणि 16 हंगामात असं कधीही घडलं नाही. 2025 चा अंतिम सामना हा भारताचा स्पर्धेतील 11वा अंतिम सामना असेल. भारत त्यांच्या नवव्यांदा ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, पाकिस्तान सहाव्यांदा अंतिम सामना खेळेल आहे आणि तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करेल. परिणामी, 2025 चा अंतिम सामना अत्यंत रोमांचक होणार आहे.
भारताचा दुसरा अंतिम सामना :
टी-20 स्वरूपात, दोन्ही संघ दुसऱ्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. 2016 मध्ये भारतानं टी-20 आशिया चषकाचं विजेतेपद जिंकलं होतं. तर 2022 मध्ये पाकिस्ताननं श्रीलंकेकडून पराभव पत्करला. आता, पाकिस्तान पहिल्यांदाच टी-20 आशिया चषकाचं विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल. हा सामना खूप रोमांचक असणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा :
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड लक्षात घेता, आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान एकूण 24 सामन्यांत एकमेकांसमोर आले आहेत, ज्यामध्ये वनडे आणि टी-20 दोन्ही स्वरुपातील सामने समाविष्ट आहेत. भारतीय संघानं 12 सामने जिंकले असले तरी, पाकिस्तानला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले. हा रेकॉर्ड आणि सध्याचा फॉर्म पाहता टीम इंडियाचा वरचष्मा स्पष्टपणे वरचढ आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा रेकॉर्डही खूपच निराशाजनक आहे, 15 पैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत.
सामन्यावरुन मोठा वाद :
सध्याच्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोनदा एकमेकांसमोर आले आहेत. पहिल्या गट टप्प्यात भारतानं पाकिस्तानला 7 विकेट्सनं हरवलं. सुपर-4 फेरीच्या सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानला 6 विकेट्सनं हरवलं. आता, दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर येणार आहेत. दरम्यान, आशिया कपमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही केलं नाही. यामुळं वाद निर्णण झाला तसंच सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू विचित्रपणे आनंद साजरा करताना दिसले.