राज्यात सध्या पावसाचा जोरदार हल्ला सुरु असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ढगफुटीसदृश्य पावसाने थैमान घातले आहे. लातूर, बीड, धाराशिव ,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी ,हिंगोली अशा सर्वच जिल्ह्यात तुफान पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्री झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर आला असून अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून जोरदार पावसामुळे आणि पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय.
परभणीत काल रात्री झालेल्या वादळी पावसाने पारंपरिक पिकांसह नगदी पिकांच देखील मोठं नुकसान झालं आहे. तर लातूरमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या तुफान पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तर रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबड तालुक्यातील अनेक गावांसोबत भेटा, आंदोरा गावचा संपर्क तुटलाय. यासोबतच जालन्यात रात्रभर झालेल्या पावसाने नद्या नाले एक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेती पिक पाण्याखाली बुडाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरले.
पूरसदृश्य परिस्थिती; बाजारपेठ परिसर जलमय
विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढले. शिरूर कासारमध्ये झालेल्या पाऊसाने सिंदफना नदीला पूर आला आहे. आणि याच पुराचे पाणी परिसरातील घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरले आहे. सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केले असून तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मध्यरात्री अचानक जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे ही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नदीकाठची घरं, दुकानं सध्या पाण्यात आहेत. दरम्यान, सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
धाराशिवच्या भूम आणि परांडा तालुक्यात पावसाचा हाहाकार
धाराशिवच्या चांदणी नदीने रौद्ररूप धारण केले असून चावडी, शाळा व घराघरात पाणी साचले आहे, यामुळे गावकऱ्यांच्या जीवनावश्यक वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे. या धुवाधार पावसामुळे शेती पिकांचेदेखील प्रचंड नुकसान झाले असून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शिरसाव येथे नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे जवळपास 200 -300 लोक अडकले आहेत.
लातूर जिल्ह्यातील भेटा परिसरात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे भेटा–अंदोरा या गावाचा संपर्क तुटला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. भेटा ते अंदोरा या मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. याविषयी गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, वारंवार मागणी करूनही पुलाची उंची वाढवली गेली नसल्याने पावसाळ्यात अशा अडचणींना सामोरे जावे लागते.
शेताला तलावाच स्वरूप; शेतकऱ्यांच मोठं नुकसान
जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून जालना, घनसावंगी आणि बदनापूर तालुक्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून या भागात तालुक्यातील सेवली,धारा, पाथरूड, उमरी, शिवनगर ,उखळी, या परिसरात शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे, तर रस्त्यावरून नद्या वाहत आहेत. या पावसामुळे नद्यां, ओढ्यांना पूर आला असून शेतातील पिकं पाण्याखाली गेली आहेत.
अंबड तालुक्यातील अनेक गावात मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने नद्या नाले एक झाले असून मागणी नदीला पूर आला आहे. नालेवाडी शिवारात साठवण तलाव भरून वाहत असल्याने गावात पाणी शिरलय तर शेतातील पीक पाण्याखाली बुडाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरलाय. अंबड तालुक्यातील रेनापुरी, दयाळा ,भांबेरी या गावांमध्ये नद्या नाले एक झाल्याने संपर्क तुटलाय.
वाकी नदीला पुन्हा पूर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासून कुठे मध्यम, तर कुठे जोरदार पाऊस बरसत असून या पावसामुळे कन्नड तालुक्यात वाकी नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून दुसरीकडे पैठण तालुक्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. पैठण शहरालगत असलेल्या राहुलनगर भागात 100 घरात पाणी शिरले आहे. तर वाकी गावातही अनेक घरात पाणी शिरल्याच समोर आले आहे.
माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले
माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातून सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला असून माजलगाव धरणाचे 11 वक्री दरवाजे सध्या उघडण्यात आले असून सिंदफणा नदीपात्रात 62 हजार क्युसेक इतका पाण्याचा मोठा विसर्ग केला जात आहे. दरम्यान सिंदफणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातील पाण्याची आवक पाहता विसर्ग वाढवणे अथवा कमी केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.