नवदुर्गातील आठवे रूप म्हणजे देवी महागौरी. देवी महागौरी हे आदिशक्तीच्या नव्या रूपांपैकी एक रूप असून नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. देवीचा रंग तेजस्वी आणि शुभ्र असल्याने त्यांना महागौरी, असे नाव मिळाले आहे. तसेच देवी महागौरीला चंद्रप्रकाश आणि शंखाची उपमा दिली जाते. महागौरी हे देवी पार्वतीच्या तेजाचे प्रतीक मानले जाते, जे भक्तांना सर्व संकटांपासून मुक्ती देतात.
देवीच्या अवताराची कथा
पौराणिक कथेनुसार, राक्षसांचा वध केल्यावर देवी पार्वतीचे शरीर काळे पडले होते. त्यानंतर भगवान शिवाने देवीला प्रसन्न करून घेतले आणि त्यांना गौरवर्णाचे वरदान दिले. त्यामुळे पार्वती माता महागौरी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. कठीण तपश्चर्येनंतर देवी पार्वतीला हे गौरवर्ण प्राप्त झाल्याचं म्हटलं जात. देवी महागौरी चतुर्भज असून एका हातात त्रिशूल, दुसऱ्या हातात डमरू, तिसरा हात अभय मुद्रा तर चौथा हात वरदान मुद्रेत आहे. महागौरी देवीला अन्नपूर्णा, ऐश्वर्य प्रदायिनी आणि चैतन्यमयी म्हणूनही ओळखले जाते. या देवीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि भक्तांना शांती व समृद्धी प्राप्त होते, असं म्हटलं जात. देवी महागौरीला काळे हरभरे (काळ्या चण्याचा हलवा) नैवेद्य म्हणून दाखवले जातात.
महागौरीची पूजाविधी
नवरात्रीच्या अष्टमीला सकाळी उठून आंघोळ करून पांढरे वस्त्र परिधान अरुण देवी महागौरीची मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालून मूर्तीला पांढरे फूल अर्पण करावे. त्यानंतर देवीला हळदी-कुंकू, मिठाई, सुका मेवा आणि फळे अर्पण करावीत.
‘या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः’ या मंत्राचा जप करावा.