प्रत्येक घरात आई वडील आपला मुलगा ठराविक क्षेत्रात यशस्वी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे असे वाटते. परंतु ते मुलांसाठी हानीकारण ठरू शकतं, तर काही मुले यामुळे डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या हा पर्याय निवडतात. यातच डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून NEET परीक्षा देतात. पुढील पाच वर्षे खडतर मेहनत करतात. परंतु परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास आत्महत्या हा पर्याय निवडतात. तर बरेच जण आवडते करिअर न निवडता आल्याने आत्महत्या हा पर्याय निवडतात. अशीच एक घटना उघड झाली आहे.
ही घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील. अनुराग अनिल बोरकर असे या तरुणाचे नाव, त्याने नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच त्याने आत्महत्या केलेल्या ठिकाणी सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्यानुसार डॉक्टर व्हायचे नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याचे उघड झाले आहे. मृत अनुराग हा फक्त 19 वर्षाचा होता.
अनुरागला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस ला प्रवेश मिळाला होता. एमबीबीएस प्रवेशासाठी जाणार त्यापूर्वीच त्याने आपलं जीवन संपवलं. मृत अनुराग बोरकर याने NEET परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून 1475 वा रँक पटकावत यश मिळवले होते. डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असतानाच त्याने त्याचे जीवन संपवले. या संपूर्ण घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास नवरगाव पोलीस करत आहे.
मृत अनुरागचे अनेक मित्र परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणार होते. परंतु अनुरागचा नंबर भारतातील सरकारी रुग्णालयात लागल्याने कुटुंबाकडून येथेच मेडिकल शिक्षण घेण्यास सांगण्यात आले. मात्र अनुरागला परदेशात जाऊन मेडिकलचं शिक्षण घ्यायचं होतं. म्हणून त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.