नाशिक शहरातील बिडी कामगार परिसरात कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचा अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली असून संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
बिडी कामगार वसाहतीमधील ही तीन मुलं असून सर्व अल्पवयीन आहेत. हे मुलं सुट्टीच्या दिवशी खेळत खेळत जवळच्या एका बांधकाम साईटवर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावाजवळ गेली होती. तिथे गेल्यावर या मुलांना पोहण्याचा मोह झाला आणि त्यांनी पाण्यात उडी मारली. परंतु या तलावाची खोली, त्यातील पाण्याची स्थिती यांचा अंदाज नसल्याने तिघेही खोल पाण्यात अडकून बुडाले. या मुलांचे बेपत्ता असल्याचे लक्षात येताच पालकांनी आणि स्थानिकांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर या कृत्रिम तलावाजवळ अग्निशमन दलाला त्यांच्या कपड्याचा तुकडा सापडला होता. त्यानंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून तलावात शोधमोहीम राबवण्यात आली.
बचाव पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या तिघांचा मृत्यू बुडून झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ज्या परिसरात ही घटना घडली, तिथे कोणतीही सुरक्षेची पातळी न राखता मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवण्यात आले होते. बांधकाम साईटवर योग्य ती कुंपण व्यवस्था आणि इशारा फलक नसल्याने अशा प्रकारची दुर्घटना घडली आहे.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्याकडून सखोल तपास सुरू असून पालकांचा जाब नोंदवण्यात येत आहे. यासोबतच बांधकाम कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरातील अशा धोकादायक जागांची यादी तयार करून तिथे तात्काळ सुरक्षा उपाय राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.