बारामती तालुक्यातील मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालयाच्या मैदानातील मनोरंजन कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मे महिन्यात ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचा असल्याची माहिती समोर आली आहे. रयत शिक्षण संस्था राज्यातील मोठी संस्था असून तिच्या कारभारावर शरद पवार आणि अजित पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या व्हिडिओवरून राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. ग्रामपंचायतीकडे स्वतंत्र मैदान नसल्याने अशा कार्यक्रमांची वर्षानुवर्षे शाळेच्या प्रांगणात परंपरा असल्याचे स्थानिकांनी सांगितले.