भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यांनतर पूर्ण देशाचे लक्ष नवा उपराष्ट्रपती कोण असेल याकडे लागले होते. त्यांच्या अचानक उपराष्ट्रपती पदाच्या राजीनाम्यामुळे विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली. परंतु, त्यांनी आरोग्याच्या कारणासत्व राजीनामा दिल्याचे स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळातील चर्चेला पूर्णविराम लागला. माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यामुळे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकींसाठी कोणते उमेदवार मैदानात उतरतील यांकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यातच एनडीए पक्षाकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नाव चर्चेत होते तर प्रतिस्पर्धी म्हणून इंडिया आघाडी पक्षातून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची चर्चा होती. संपूर्ण देशभर चर्चा सुरू होती.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अधिकृत घोषणा करत एनडीए पक्षाकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन तर प्रतिस्पर्धी म्हणून इंडिया आघाडी पक्षातून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. काल म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी संसद भवनात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. संसद भवनात सकाळी 10 वाजता मतदान सुरु करून संध्याकाळी 5 पर्यंत मतदान सुरु होते. यामध्ये ९८ टक्के मतदान झाले असून सर्वात पहिले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदान केले. त्यांनतर केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे उपसभापती, काँग्रेस पक्षाच्या संसदीय अध्यक्षा-अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि लोकसभेतील खासदारांनी मतदान करत मतदानाचा हक्क गाजवला. त्यामध्ये केंद्रीयमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, भाजप खासदार कंगना राणावत, काँग्रेस विरोधी नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्यभरातील खासदार उपस्थित होते.
या निवडणुकीच्या दरम्यान, भारत राष्ट्र समिती पक्षातील ४ राज्यसभा खासदारांनी तर बिजू जनता दल या पक्षातील ७ खासदारांनी आणि शिरोमणी अकाली दल या पक्षातून १ लोकसभा आणि २ राज्यसभा खासदारांनी मतदान केले नव्हते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृह पात्र होते तर यामध्ये एकूण ७८८ सदस्य असून त्यात २४५ राज्यसभेचे तर ५४३ लोकसभेचे सदस्य आहेत. संसदमध्ये ७ जागा रिक्त असण्यामुळे एकूण संख्या ७८१ असल्यामुळे या परिस्थिती ३९१ मत जिंकण्यासाठी हवी होती.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणी अखेर एनडीए पक्षाच्या सी.पी. राधाकृष्णन यांना ४५२ मतांनी विजयी घोषित केले तर इंडिया आघाडी पक्षाच्या निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले. उपराष्ट्रपती पदाच्या निकालानंतर एनडीए पक्षाच्या सी.पी. राधाकृष्णन यांची अधिकृत उपराष्ट्रपती पदासाठी शिक्कामोर्तब झाला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीआधी एनडीए पक्षाचे एकत्रित संख्याबळ ४२७ होते. परंतु, निवडणुकीच्या मतमोजणी शेवटी एनडीएला ४५२ मतं मिळाली त्यामध्ये अतिरिक्त २५ मतं जास्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त २५ मतं कशी आली असतील असा प्रश्न उपस्थित होताच एनडीएच्या नेत्यांनी सांगितले की, आंध्रचे माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या पक्षाने सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यांची ११ मते एनडीएच्या खात्यात पडली. पण, उर्वरित १४ मतांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
या उर्वरित १४ मतांसाठी विरोधी खासदारांकडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी ‘आप’ आणि शिवसेना (ठाकरे गट) यांना जबाबदार धरत त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे काँग्रेससोबतचे संबंध दिल्ली आणि हरियाणाच्या जागावाटपावरून काही दिवसांपासून ठीक नसल्यामुळे त्यांनी गुप्त मतदान केली असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच इंडिया आघाडीच्या अंतर्गत गटबाजी बिहारच्या निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आल्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे.
प्रीती हिंगणे (लेखिका)