साताऱ्यातील वास्तु प्लाझा अपार्टमेंटमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघा चोरट्यांपैकी एकाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे पावणेतीन वाजता ही घटना घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन चोरटे त्यांच्या तावडीत सापडले. जीव वाचवण्यासाठी एक चोरटा ड्रेनेजच्या पाईपवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळला आणि जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या चोरट्याला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. यादरम्यान झालेल्या झटापटीत एका नागरिकाला लोखंडी रॉडने मार लागून दुखापत झाली आहे. तिसरा चोरटा मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.