सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी ग्रुपसह जाण्याची तयारी करत आहे. परंतु पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी जाणे तुमच्या जीवावर बेतू शकते. पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी दूर दूर वरून पर्यटक येत असतात. अशातच पर्यटनासाठी सिंहगड किल्ल्यावर आलेल्या ग्रुप मधून एकाचा तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळून बेपत्ता झाल्याची घटना उघड झाली आहे.
पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथे असलेल्या हवा पॉईंट जवळील खोल दरीत पाय घसरून गौतम गायकवाड नावाचा 24 वर्षीय तरुण बेपत्ता झाला. गौतम हा हैदराबाद वरून 5 मित्रांच्या ग्रुप सह आला होता. सायंकाळच्या सुमारास गौतमने लघुशंकेस जाऊन येतो असे मित्रांना सांगितले. परंतु बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही म्हणून त्याचा शोध घेतला असता तो कुठेही दिसला नाही. परंतु त्याची चप्पल तानाजी कड्यावर हवा पॉईंट शेजारी सापडली.
सिंहगड परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून वाऱ्याचा वेग देखील जास्त आहे. वाऱ्याचा आणि जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी व स्थानिक गिर्यारोहक कार्यकर्ते यांनी पाहणी केली. परंतु रात्रीच्या वेळी अंधारात तो सापडला नाही म्हणून आज सकाळ पासून पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.
लेखिका – विजया सोळंके