कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (20 ऑगस्ट ) रोजी श्वेताला रवीने भेटायला बोलावले, तेव्हा त्याने तिला लग्नाची मागणी घातली; पण श्वेताने लग्नाला नकार दिल्याने रवीने गाडी थेट तलावात घातली. रवीला पोहता येत असल्याने तो तलावातून पोहत बाहेर आला. मात्र, श्वेता गाडीत अडकल्याने तलावात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रवी आणि श्वेताची पहिल्यांदा कामाच्या ठिकाणी ओळख झाली होती त्यामुळे अनेक वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. त्या ओळखीतूनच मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हावे यासाठी रवीने लग्नाची मागणी घातली, पण श्वेताने ती नाकारली. तिने लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून रवीने श्वेताची हत्या केली आणि त्याला अपघात झाल्याचा बनाव तयार केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी गाडीला बाहेर काढून श्वेताचा मृतदेह ताब्यात घेतला परंतु, तपासाच्या वेळी ही घटना संशयास्पद वाटल्याने त्यांनी रवीला ताब्यात घेतले.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, रवी विवाहित असून त्याला श्वेतासोबत लग्न करायचे होते. श्वेताने लग्नाला होकार दिला असता तर तो त्याच्या विवाहित पत्नीला घटस्फोट देणार होता. श्वेता सुद्धा विवाहित होती, मात्र ती नवऱ्यापासून वेगळी तिच्या आई- वडिलांसोबत राहत होती. तिला रवीसोबत कोणतेही संबंध ठेवायचे नव्हते. रवी सारखा तिच्यामागे लग्नासाठी लागला होता, तिला त्याची प्रेयसी बनवण्यासाठी त्याने प्रेमाचे खोटे नाटक करून तिला जाळ्यात ओढायचा प्रयत्न केला. मात्र, श्वेताने नकार दिल्याने त्याने तिची हत्या केली आणि पोलिसांसमोर अपघात झाला असल्याचा दावा केला. पोलिसांनी आरोपी रवीला श्वेताच्या आई-वडिलांच्या तक्रारीनंतर अटक केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. श्वेताने रवीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. रवीच्या पुरुषी अहंकारामुळे निष्पाप श्वेताचा जीव गेला..
देशभरात अशा अनेक घटना घडतात, प्रेमाच्या अपयशातून अनेक गुन्हे घडतात, अनेक जणांचे आयुष्य उध्वस्थ होतात. श्वेतासारख्या अनेक स्त्रिया रवी सारख्या लोकांच्या जाळ्यात अडकतात आणि जीवाला मुकतात.. त्यामुळे लोकांवर विश्वास ठेवताना डोळे उघडे ठेवून विचार करा..