धाराशिव-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तेरणा अभियांत्रिकी कॉलेजजवळ शनिवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने उभ्या असलेल्या मालवाहतूक ट्रकला प्रवासी रिक्षाची जोरदार धडक बसली. या अपघातात वडगाव सिद्धेश्वर येथील रिक्षाचालक प्रदीप बुबासाहेब हजारे यांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षा ट्रकखाली अडकून चक्काचूर झाली होती. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.