पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेला 24 वर्षीय गौतम गायकवाड याच्या बेपत्ता होण्याने गेल्या पाच दिवसांपासून निर्माण झालेलं रहस्य अखेर सुटलं. 20 ऑगस्ट 2025 रोजी मित्रांसह किल्ल्यावरील तानाजी कडा परिसरात फोटो काढताना गौतम खोल दरीत कोसळल्याची भीती व्यक्त केली जात होती.
NDRF अग्नीशामक दल, वनविभाग, पुणे पोलीस आणि स्थानिक ट्रेकर्स यांनी सलग चार दिवस पावसात आणि दाट धुक्यात शोधमोहीम राबवली. अखेर 24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी गौतम जिवंत सापडला, पण त्याच्या बेपत्ता होण्यामागील कारणांनी नवं कोडं निर्माण झालं आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयास्पद दृश्य आणि त्याच्यावरील कर्जाचा मुद्दा यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आहेत.
नेमकं काय घडलं ?
गौतम गायकवाड, मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा असून, तो सध्या हैदराबाद येथे राहणारा आहे. तो 20 ऑगस्ट रोजी मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरायला आला होता.
सायंकाळी 4:30 वाजता तानाजी कडा परिसरात पोहोचल्यानंतर गौतमने लघुशंकेसाठी जातो, असं सांगून मित्रांना बाजूला जाण्याचं कारण दिलं. मात्र, तो परत न आल्याने मित्रांनी शोधाशोध केली. त्याची चप्पल हवा पॉईंटजवळ आढळली, आणि त्यामुळे तो दरीत पडला असावा, अशी शंका निर्माण झाली.
पोलिसांनी सायंकाळी 7:45 वाजता माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ट्रेकर्सनी शोधमोहीम सुरू केली. पावसामुळे दृश्यमानता कमी होती, आणि रात्री 11 वाजता शोधमोहीम थांबवावी लागली. 21 ऑगस्टपासून पुढील तीन दिवस सलग शोध सुरु होता, पण गौतमचा शोध लागत नव्हता. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती लपतछपत पळताना दिसली, जी गौतम असू शकते, असा पोलिसांचा संशय होता. या फुटेजमध्ये गौतम खरोखर दरीत पडला की त्याने बैपत्ता होण्याचा बनाव रचला, असा प्रश्न उपस्थित झाला.
गौतम जीवंत सापडला
24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता, तानाजी मालुसरे स्मारकाजवळ
पर्यटकांना दरीत हालचाल दिसली. स्थानिकांनी तिथे जाऊन पाहिलं असता गौतम गायकवाड जिवंत, पण अशक्त अवस्थेत आढळला. त्याला किल्ल्यावरील वाहनतळापर्यंत आणलं, आणि हवेली पोलिसांनी त्याला खानपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, तो बोलण्याच्या मनस्थितीत नाही.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत गौतमने दावा केला की, पडला आणि स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडत होता. मात्र पोलिसांना संशय आहे की, गौतमने हा बेपत्ता होण्याचा बनाव रचला असावा. सूत्रांनुसार, गौतमवर मोठं कर्ज आहे, आणि याच कारणामुळे त्याने असा बनाव रचला असण्याची शक्यता आहे.