पुणे : आशिया कप २०२५ मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होणार आहे. हा सामना दुबईला होणार असून क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना अभूतपूर्व पर्वणी असेल. भारत-पाक सामना क्रिकेट चाहत्यांसाठी रोमांचक जरी असला तरी देशात यावरून राजकीय वातावरण तापले आहे. अनेक राजकीय पक्षांनी या सामन्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. एप्रिलमध्ये दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला होता, ज्यात निष्पाप 26 जणांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच भारताने पाकिस्तानविरुद्ध सामने खेळणे म्हणजे त्या दहशतवादी हल्ल्याला नजरअंदाज करणे अशा प्रकारे विरोधी पक्षांनी विद्यमान सरकार आणि बीसीसीआय यांच्यावर जोरदार टीका केली.
भारत-पाक सामना म्हणजे देशद्रोह आणि शहीद कुटुंबांच्या भावनांचा अपमान असल्याचे म्हंटले जात आहे. विरोधी नेत्यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला असून तुम्हाला आर्थिक नफा जास्त महत्वाचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, दहशतवाद्यांनी भारतीयांची निर्दयपणे हत्या केली तरीही तुम्ही अशा गोष्टींना परवानगी कशी देऊ शकता अशी ही टीका केली.
महाराष्ट्रभर शिवसेना (ठाकरे गट) पक्षांनी या सामन्याचा निषेध करण्यासाठी ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलन करत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आपल्या बांधवांवर पाकिस्तानने आश्रय दिलेल्या दहशदवाद्यांनी भ्याड हल्ला केला. तरीही भारत सरकार पाकिस्तानसोबत सामना खेळायची परवानगी देत आहेत. हा सामना खेळवणे म्हणजे राष्ट्रीय भावनांचा अपमान करणे असा आहे.’ असं म्हणत निषेध नोंदवला. ऑपरेशन सिंदूरचे महत्त्व कमी करण्यासाठी सामना आयोजित केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर ‘माझं कुंकू-माझा देश’ जाहीर करून लोकांना सामन्याचा निषेध करण्याचं आवाहन केलं. जर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तर रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे चालेल? असा प्रश्न करत भाजपवर हल्लाबोल केला.
समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी केंद्र सरकारच्या धोरणातील ‘दुहेरी’ भूमिका उघड केली. पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांनीही सामना थांबवण्याची मागणी केली. शुभम द्विवेदी यांच्या विधवेनं बीसीसीआयवर “असंवेदनशीलतेचा” आरोप केला. सावन परमार, ज्यांनी हल्ल्यात वडील आणि भाऊ गमावले, त्यांनी ऑपरेशन सिंदूरला “व्यर्थ” ठरवलं. त्यांच्या मते, पाकिस्तानशी संबंध ठेवणे म्हणजे शहीदांचा विश्वासघात आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने भूमिका स्पष्ट केली. सचिव देवजित सैकिया यांनी सांगितलं की भारत हा सामना खेळतो आहे कारण आशिया कप ही बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्यांच्या मते, अशा स्पर्धेतून माघार घेतल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब होईल आणि भविष्यात भारतात ऑलिंपिक किंवा मोठ्या स्पर्धा आयोजित करण्याच्या संधींवर परिणाम होईल. त्यांनी स्पष्ट केलं की द्विपक्षीय क्रिकेट बंदच आहे, मात्र बहुपक्षीय स्पर्धांमध्ये भाग घेणं ही गरज आहे. जर भारत हा सामना खेळला नाहीतर त्यांना कमी गुण मिळतील त्यामुळे त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल.
एकीकडे सरकार आणि बीसीसीआय बहुराष्ट्रीय स्पर्धांच्या नियमांचा दाखला देत आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्ष या होणाऱ्या सामन्याला विरोध दर्शवत आहेत. राष्ट्रप्रेम म्हणवून घेणारे हा सामना का अडवत नाहीये असा घणाघात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर केला आहे.
थोडक्यात, आशिया कप २०२५ चा भारत-पाक सामना हा केवळ क्रीडा स्पर्धा राहिलेला नाही, तर तो राष्ट्रीय भावना, शहीदांचा सन्मान आणि सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणारा राजकीय व सामाजिक वाद ठरला आहे.