पुरंदर: पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक दौंडज येथे भर दिवसा घरात दरोडा टाकून पळून चाललेल्या चोरांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत जेलबंद केले. त्यापूर्वी चोरांना पकडण्यास गेलेल्या तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून पोबारा करण्याचा प्रयत्न चोरांनी केला. मात्र, जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांनी पथकासह त्या चोरांना शस्त्रासोबत पकडले असून तिघांना ताब्यात घेण्यास यश आले.
जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये चोरांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न जेजुरी पोलिसांकडून केला जातो आहे. चोरीच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी शनिवारी दुपारी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडज गावामध्ये एका वस्तीवर दरोडा टाकून तीन चोरांनी पसार व्हायचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिक तरुणांनी त्यांच्या पाठलाग केला. त्यातच नीरा जवळच्या थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची अडचण झाली. यादरम्यान दौंडज पासून चोरांचा पाठलाग करत आलेल्या तरुणांनी चोरांना पकडले. या तरुणांना पिस्तुलाचा धाक दाखवून चोरांनी पळून जायचा प्रयत्न केला त्यात दोन जणांना पळून जाण्यात यश ही आहे. तर वाहन चालकाला त्यांनी पकडून ठेवले. यादरम्यान घटनेची माहिती जेजुरी पोलिसांना मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे त्याचबरोबर पीएसआय सर्जेराव पुजारी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळाकडे धाव घेतली. पुणे-पंढरपूर मार्गावर रस्त्याच्याकडेला असलेल्या शेतामध्ये हे चोर लपून बसले होते. तेव्हाच आसपासच्या गावातील तरुणांनी संपूर्ण शेतीला वेढा घातला. त्यामुळे चोरांना पळून जाणे अशक्य झाले.
या घटनेची माहिती जेजुरी पोलिसांना मिळताच त्यांनी ड्रोनच्या मदतीने संपूर्ण शेतीचा सर्वे केला. उसाचे क्षेत्र असल्याने पोलिसांना चोरांना शोधणे अवघड झाले होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे पिस्तूल असल्यामुळे कोणतीही धोका न पत्करता पोलिसांनी तरुणांना फक्त राखण करा. कोणीही उसाच्या शेतामध्ये जाऊ नये असे निर्देश दिले. ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये हे चोर ऊसाच्या शेतामध्ये असल्याचे दिसून आले. यानंतर पोलीस आणि तरुणांनी जाऊन या चोरांच्या मुसक्या आवळल्या. जेजुरी पोलिसांनी या चोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अधिकचा तपास सुरु असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांनी सामाजिक माध्यमांना दिली. जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात असलेले लखनसिंग रतपुतसिंग धुधानी (वय ३५), बेहतसिंग शामसिंग कल्याणी (वय ३०), रत्नेश राजकुमार पुरी (वय २३) रा. संभाजीनगर यांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. चोरांना पकडण्यासाठी पोलिस टीममध्ये संदीप मदने, केशव जगताप, संदीप भापकर, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण, प्रसाद कोळेकर, आदींनी सहभाग घेतला होता. रात्री उशिरापर्यंत त्या चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
“जेजुरी पोलीस स्टेशनची टीम चोरांना पकडण्यास गेली असताना स्थानिक तरुणांनी देखील चांगलं सहकार्य केलं. तरुणांच्या सहकार्यामुळे चोरांना पळून जात आले नाही. पोलीस टीम मधील कर्मचाऱ्यांनी देखील तत्परता दाखवली आणि त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करणे शक्य झाले असून जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील चोऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकांचे सहकार्य लाभले तर अशा प्रकारच्या चोरांचा बंदोबस्त करणे सहज शक्य होईल.” – दीपक वाकचौरे (प्रभारी अधिकारी, जेजुरी पोलिस स्टेशन)