बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीला शोधून काढत त्याला अटक केली आहे.
मुंबई येथील दादर भागात मीनाताई ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीकडून लाल रंग फेकण्यात आल्याची माहिती काल दुपारच्या सुमारास उघड झाली होती. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घटनास्थळी पोहोचले होते. आता या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलिसांनी लावला आहे.
मीनाताई ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर उपेंद्र पावसकर या व्यक्तीने लाल रंग फेकला होता. या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उपेंद्र पावसकर हा ठाकरे कुटुंबातील एका कार्यकर्त्याचा नातेवाईक असल्याची माहिती उघड झाली असून या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. याबाबत आरोपीला विचारले असता, ठाकरे पितापुत्रांनी संपत्तीच्या वादात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोपी उपेंद्र पावसकर याने आदित्य ठाकरे आणि श्रीधर पावसकर यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात दरवेळी तक्रार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे माजी बॉडीगार्ड श्रीधर पावसकर हे होते. हा आरोपी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. असे सांगितले जात आहे. परंतु श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबीयांनी उपेंद्र पावसकरला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.
काय आहे हा संपूर्ण प्रकार
मुंबई येथील दादरच्या शिवाजी पार्क येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार 16 सप्टेंबर रोजी घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. तर संपूर्ण घटनेची माहिती मिळताच मनसेप्रमुख राज ठाकरे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले होते. राज ठाकरे यांनी 24 तासाच्या आत आरोपीला शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांना दिले होते. मीनाताई ठाकरे यांचे 1995 साली निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा अर्धकृती पुतळा दादर येथील शिवाजी पार्क परिसरात उभारण्यात आला.