सध्या देशात बॉलीवूडला टक्कर देत साऊथ सिनेमांची हवा जोरात आहे. पण गेल्या काही वर्षांत कन्नड सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यातल्या त्यात ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ सिनेमाचं नाव सर्वात आधी येतं. 2022 मध्ये, आलेल्या ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ सिनेमानं भारतीय चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व अशी कामगिरी करत प्रचंड नावलौकिक मिळवला. अशातच आता ऋषभ शेट्टी ‘कांतारा’चा प्रीक्वेल घेऊन येत आहे. आता ‘कांतारा चॅप्टर 1’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
‘कांतारा चॅप्टर 1’चा ट्रेलर रिलीज
‘कांतारा चॅप्टर 1’ ची रिलीज डेट 2 ऑक्टोबर 2025 ही निश्चित करण्यात आली आहे. साधारणतः अनेक निर्माते त्यांच्या सिनेमाची मार्केटिंग टीझर आणि ट्रेलर प्रदर्शन तब्बल 21 ते 30 दिवस आधी सुरू करतात. मात्र ‘कांतारा चॅप्टर 1’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायला फक्त 10 दिवस शिल्लक असताना सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये नक्की काय दाखवलं?
मागील भाग जिथे थांबलेला, तिथून ‘कांतारा चॅप्टर 1’ चा ट्रेलर सुरू होतो. यावेळी, कथा कांताराच्या पौराणिक इतिहासात डोकावते, ज्याबद्दल आतापर्यंत कोणालाही माहिती नव्हती. निर्मात्यांनी या ट्रेलरमध्ये फारशी गुपितं उघड केलेली नसल्याने मोठ्या प्रमाणात गूढ, रहस्य कायम ठेवण्यात आली आहेत. या प्रीक्वेलमधील सस्पेन्समुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचणार, यात काही शंकाच नाही.
‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये काय आहे खास?
‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये ऋषभ शेट्टीची भूमिका नेमकी काय असणार? हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल. दरम्यान, हा चित्रपट बनवण्यासाठी अभिनेत्याने खूप मेहनत घेतली आहे. त्यानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत मिळून ‘कांतारा चॅप्टर 1’ साठी एक भव्य युद्ध सीन तयार केलाय, ज्यामध्ये 500 हून अधिक कुशल सैनिक आणि 3,000 लोक सहभागी झाले होते. हा सीन 25 एकर शहरात, खडकाळ भूभागावर 45-50 दिवसांत चित्रित करण्यात आला, ज्यामुळे तो भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठ्या सीन्सपैकी एक आहे.