सध्या महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये या धुवाधार पावसाने हैदोस घातला असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी आणि आमदारांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने येथील सिरसाव गावातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे घरातील सर्व वस्तू वाहून गेल्या. तर लहान मुलांची शाळेची पुस्तकं, वह्या घरात पाणी शिरल्याने भिजल्याने ही लहान मुले आता आपली शाळेची पुस्तकं आणि वह्या सुकवताना दिसत आहेत. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जोरदार पावसाने चांदणी नदीला गंभीररीत्या महापूर आला आहे. यामुळे नागरिक पाण्यात अडकून पडले होते. याचबरोबर पशुधनाचे ही मोठे नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसाने हैदोस घातला असून आंबी गावात घरात शिरलं पाणी शिरल्याने घरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. यामुळे लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक रस्ते बंद झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत.
धाराशिवमध्ये भूम, परांडा, कळंब परिसरात मुसळधार पाऊस झाला असून अंबी गावाला पूराच्या पाण्याचा वेढा पडला असून भूममधील अंबी गावच्या चहू बाजूने पाणी झाल्याने तालुक्याशी संपर्क तुटला आहे. यासोबतच रात्रीपासून वीज नाही, तसेच इंटरनेट सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
धाराशिवमधील मुसळधार पाऊसाने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असून धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मदतीचे साहित्य घेऊन उद्या दि. २४ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.
परंड्यातील वडनेरमध्ये कुटुंब अन्न पाण्याविना पुरात अडकलं असून NDRF च्या साथीनं ओमराजे निंबाळकर स्वत: पाण्यात उतरले असून ओमराजे निंबाळकर यांच्याकडून एनडीआरएफसोबत बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.